10 वर्षांचा मुलगा बलात्कार करतोय..; दिल्ली प्रकरणामुळे हादरली तापसी पन्नू, मांडला विचार करायला लावणारा प्रश्न

देशात दररोज बलात्काराच्या जवळपास 80 घटना घडत आहेत, असं म्हणत अभिनेत्री तापसी पन्नूने चिंता व्यक्त केली आहे. आगामी 'अस्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाली.

10 वर्षांचा मुलगा बलात्कार करतोय..; दिल्ली प्रकरणामुळे हादरली तापसी पन्नू, मांडला विचार करायला लावणारा प्रश्न
Taapsee Pannu
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2026 | 9:04 AM

अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी ‘अस्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तापसीने देशातील वाढत्या बलात्काराच्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांची मुलंदेखील गुन्हेगार आहेत आणि जर मुलांची दिशाभूल होत असेल तर आपण काहीतरी चुकीचं करत आहोत, असं ती म्हणाली. ही परिस्थिती बदलण्याची खूप गरज असल्याचंही तिने सांगितलं. ‘अस्सी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तापसी जयपूरला पोहोचली होती. चित्रपटाच्या मुद्द्यांवर बोलताना तिने समाजातील वाढत्या भयानक घटनांबद्दलही भाष्य केलं. लोक बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांना सर्वसामान्य बातमी मानत असल्याची चिंता तिने यावेळी व्यक्त केली.

“देशात दररोज सुमारे 80 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. समाजाने या मुद्द्यांना अत्यंत गंभीरपणे घेण्याची गरज आहे. मी दिल्लीची आहे. मी दररोज बलात्काराच्या घटनांबद्दल खूप काही वाचते. या बातम्या वाचल्यानंतरही लोक बलात्काराला एक सामान्य गुन्हा मानू लागले आहेत. त्याकडे ते चोरीच्या गुन्ह्यासारखे पाहू लागले आहेत. दररोज जवळपास 80 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात असताना मला या गोष्टींकडे पाहून खूप राग येतो. हे सर्व सहनशक्तीपलीकडे चाललंय”, अशा शब्दांत तापसी व्यक्त झाली.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेबद्दल ती पुढे म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मी 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं ऐकलं. यात आरोपी मुलं 10 ते 13 वयोगटातील होती. हे आणखी धक्कादायक आहे. अशा घटना का होत आहेत, याचा विचार करायला लावणारा ‘अस्सी’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना न्यायाधीशाच्या भूमिकेत बसावं लागेल. तुम्हाला काय वाटलं, याचं जजमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे, यात तुम्ही काय न्याय देणार, हे महत्त्वाचं आहे.”

“बलात्कार प्रकरणात जर 10 वर्षांचा मुलगा गुन्हेगार असेल तर त्यामागे काय कारण असू शकतं? मुलांना चुकीच्या पद्धतीने वाढवलं जात आहे. आपल्या सर्वांना याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण कुठेतरी याचा चुकीचा परिणाम होत आहे. आपल्या घरापासूनच याची सुरुवात करायला हवी. आपल्या मुलांनाच चांगली शिकवण द्यावी लागेल. समाजात कसं वावरलं पाहिजे आणि कोणी दुसरी व्यक्तीसुद्धा असं चुकीचं काम करू नये, या उद्देशाने त्यांना घडवायला हवं”, असं तापसी म्हणाली.

‘मुल्क’, ‘थप्पड’ आणि ‘आर्टिकल 15’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हाच ‘अस्सी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ‘अस्सी’मध्ये समाज आणि यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू, कानी कुसृती, रेवती, कुमुद मिश्रा, झीशान अयूब, नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि सीमा पाहवा यांच्या भूमिका आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.