उमेश-मुक्ताची ‘अजूनही बरसात आहे’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

'ही' नवी मालिका घेणार 'अजूनही बरसात आहे'ची (Ajunahi Barsaat Aahe) जागा

उमेश-मुक्ताची अजूनही बरसात आहे मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
Ajunahi Barsaat Aahe
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:00 PM

मराठीतील लोकप्रिय कलाकार उमेश कामत (Umesh Kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) हे सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barsaat Aahe) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये मुक्ता ही मीरा तर उमेश हा आदिराजची भूमिका साकारत आहे. १२ जुलै २०२१ रोजी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. वर्षभराच्या आतच ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. या मालिकेमुळे उमेश आणि मुक्ता ही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली. या जोडीमुळेच मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास सात महिन्यांपासून ही मालिका प्रसारित होत असून कथानकात अनेक वळणं पहायला मिळाली. मीरा-आदिराजचा भूतकाळ, त्यांचं ब्रेकअप, त्यानंतर पॅचअप, लग्न, लग्नानंतरचं आयुष्य या घडामोडींनी प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे.

या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी दोघांनी एकत्र काम केलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, १३ मार्च २०२२ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेची जागा ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका घेणार आहे. १४ मार्चपासून त्याच वेळेत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत सासू-सुनेची अनोखी कथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये उषा नाडकर्णी, सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. संचिताने याआधी ‘बंध रेशमाचे’ आणि ‘प्रीत परी तुझ्यावरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सुकन्या मोने यांनी काही दिवसांपूर्वीच ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत काम केलं.