‘द फॅमिली मॅन 3’मधल्या दिग्गज अभिनेत्याचं निधन; 300 हून चित्रपटांमध्ये केलंय काम

नेपाळचे दिग्गज अभिनेते सुनील थापा यांचं निधन झालं. काठमांडूमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. शेवटचे ते 'द फॅमिली मॅन 3'मध्ये झळकले होते.

द फॅमिली मॅन 3मधल्या दिग्गज अभिनेत्याचं निधन; 300 हून चित्रपटांमध्ये केलंय काम
Sunil Thapa
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 08, 2026 | 8:53 AM

नेपाळचे दिग्गज अभिनेते सुनील थापा यांचं 7 फेब्रुवारी 2026 रोजी काठमांडूमध्ये अचानक निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. ते शेवटचे ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये झळकले होते. थापा हे नेपाळी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार होते आणि त्यांनी तब्बल 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. नुकतेच ते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन 3’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. काही रिपोर्ट्समध्ये सुनील थापा यांच्या निधनाचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं जात आहे. थापाथली इथल्या नॉर्विक रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र बहादूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, थापा यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणलं गेलं होतं. सकाळी 7.44 वाजताच्या सुमारास त्यांचा ईसीजी करण्यात आला, त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

हृदयविकाराच्या झटक्याने निधन?

“जेव्हा त्यांना रुग्णालयात आणलं गेलं, तेव्हा ते बेशुद्ध होते. ताबडतोब त्यांचा ईसीजी काढण्यात आला आणि त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं”, अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सुनील थापा यांनी 1970 च्या दशकात मुंबईत मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती आणि विविध कपड्यांच्या ब्रँड्ससोबत त्यांनी काम केलं होतं. इतकंच नव्हे तर ते बॉम्बे क्लबसाठी फुटबॉलसुद्धा खेळले होते. मॉडेल आणि अभिनेता असण्यासोबतच थापा यांनी एक फोटो जर्नलिस्ट म्हणूनही काम केलं आणि 1974 मध्ये भूतानच्या राज्याभिषेकला कव्हर केलं होतं.

300 हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

सुनील थापा यांनी 300 हून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत आणि ‘चीनो’, ‘राते कैला’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांची खूप प्रशंसा झाली. या भूमिकांनी त्यांना नेपाळी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांत प्रसिद्ध खलनायकांपैकी एक बनवलं होतं. नेपाळी चित्रपटांमध्ये ते त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जायचे. आपल्या दमदार अभिनयकौशल्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कारसुद्धा जिंकले होते. त्यांनी दोन वेळा मोशन पिक्चर्स अवॉर्ड नेपाळसुद्धा पटकावला होता.

सुनील थापा यांनी कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात केली होती. त्यांना प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटामुळे विशेष ओळख मिळाली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नामांकनदेखील मिळालं होतं.