The Kerala Story | कॉन्ट्रोव्हर्सीचा ‘द केरळ स्टोरी’ला चांगलाच फायदा; दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी वाढ

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी'ने जर याच गतीने कमाई केली तर पुढील काही दिवसांत तो बजेटचा आकडा सहजरित्या पार करू शकेल.

The Kerala Story | कॉन्ट्रोव्हर्सीचा द केरळ स्टोरीला चांगलाच फायदा; दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी वाढ
Image Credit source: Twitter
| Updated on: May 07, 2023 | 8:11 AM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आज (7 मे) तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथेवरून बराच वाद निर्माण झाला आणि त्यावर आता विविध कलाकारांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावरही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळालं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.  या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

ज्या ज्या चित्रपटावरून वाद निर्माण झाला किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा इतिहासच आहे. याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबतही हेच घडलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानेही वादानंतर तुफान कमाई केली होती. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’लाही वादाचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय.

‘द केरळ स्टोरी’ची कमाई

शुक्रवार – 8.03 कोटी रुपये
शनिवार – 12.50 कोटी रुपये
एकूण – 20.53 कोटी रुपये

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने जर याच गतीने कमाई केली तर पुढील काही दिवसांत तो बजेटचा आकडा सहजरित्या पार करू शकेल. शनिवारनंतर रविवारच्या कमाईतही आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

चित्रपटाचा वाद

‘द केरळ स्टोरी’च्या टीझरमध्ये 32 हजार महिलांचा उल्लेख करण्यात आला होता. केरळमधील 32 हजार महिलांचं धर्मपरिवर्तन करून ISIS या दहशतवादी संघटनेत सामील करून घेतल्याचं म्हटलं होतं. यावरूनच मोठा वाद निर्माण झाला आहे. केरळ सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्याची मागणी केली आहे. सीपीएम आणि काँग्रेसने चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका मांडली. तर दुसरीकडे वितरकांनी त्यांचा वेगळा मुद्दा मांडला. जरी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही तरी त्याला ओटीटीवर असंख्य प्रेक्षक पाहतील. त्यामुळे तो थिएटरमध्येच प्रदर्शित करावा, असं ते म्हणाले.