अवघ्या 3 दिवसांत या चित्रपटाने मोडले बॉक्स ऑफिसवर मोठमोठे रेकॉर्ड

अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉलिवूडच्या चित्रपटांनाही जोरदार टक्कर दिली आहे. जगप्रसिद्ध दिग्दर्शकाचा हा चित्रपट आता कोणते नवीन विक्रम रचणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अवघ्या 3 दिवसांत या चित्रपटाने मोडले बॉक्स ऑफिसवर मोठमोठे रेकॉर्ड
जाणून घ्या या चित्रपटाची कमाई
Image Credit source: Youtube
| Updated on: Jul 20, 2026 | 11:04 AM

जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये ख्रिस्तोफर नोलन यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांचा बहुचर्चित ‘द ओडिसी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. भारतातही या चित्रपटाची तुफान क्रेझ असून गेल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. नोलन यांच्या करिअरमधील भारतातील सर्वांत मोठी ओपनिंग या चित्रपटाला मिळाली. त्यानंतर वीकेंडलाही कमाईची गती कायम राहिली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘द ओडिसी’ने बॉक्स ऑफिसवर 17.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी थेट हा आकडा 22 कोटी रुपयांवर पोहोचला. आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचेही आकडे समोर आले आहेत.

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘द ओडिसी’ने तिसऱ्या दिवशी 19.64 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 59.04 कोटींवर पोहोचला आहे. नोलन यांच्या या चित्रपटाची सर्वाधिक कमाई इंग्रजी व्हर्जनमध्ये झाली आहे. इंग्रजी भाषेत या चित्रपटाने 15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर हिंदीत 2.91 कोटी रुपये, तेलुगूमध्ये 1.10 कोटी रुपये आणि सर्वांत कमी तमिळ भाषेत 63 लाख रुपये इतकी झाली.

‘द ओडिसी’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच वीकेंडमध्ये दमदार कमाई करत बॉलिवूड चित्रपटांनाही टक्कर दिली आहे. तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात आतापर्यंत सर्वांधिक कमाई करत नोलन यांच्या करिअरमधील ‘मोठ्या ओपनिंग’चा विक्रम रचला आहे. याआधी त्यांच्या ‘ओपनहायमर’ने पहिल्या दिवशी 14.50 कोटी रुपये कमावले होते.

‘द ओडिसी’मध्ये ख्रिस्तोफर नोलन यांनी ट्रोजन वॉरनंतर ग्रीसमधील सर्वांत दमदार योद्धा ओडिसियसच्या (मॅट डेमन) घरवापसीची कथा दाखवली आहे. एखाद्या महाकाव्याला साजेशी दृश्ये, त्या दृश्यांना एका अद्भुत अनुभवात बदलणारं संगीत आणि पात्रांमधील संवादांना तत्त्वज्ञानात रुपांतर करणारे डायलॉग्स.. या सर्वांच्या आधारावर नोलन यांनी अशी एक जादुई कथा मांडली आहे, जी तुम्हाला 2 तास 52 मिनिटं खुर्चीला खिळवून ठेवेल. कलाकारांचं दमदार अभिनय असो, दिग्दर्शन असो, टेक्निकल ताकद असो किंवा लेखनाची जादू असो.. ‘द ओडिसी’ हा या वर्षातील सर्वांत शानदार सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

Follow Us