Tiger Shroff: टायगर श्रॉफ प्रकरणी मोठा ट्विस्ट! दादर स्टेशनवर राधा-बबिताने… नेमकं काय घडलं?
Tiger Shroff: बॉलिवूड अभिवेता टायगर श्रॉफ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आता दोन नावे समोर आली आहेत. त्या दोन महिलांनी दादर स्थानकात नेमकं काय केलं? जाणून घ्या...

मुंबईच्या जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला, मात्र त्याचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. बाबा सिद्दिकी यांची हत्या, सलमान खान यांच्या घरावर गोळीबार आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील हल्ला अशा सातत्याने घडलेल्या घटनांनंतर आता टायगर श्रॉफवरही असाच जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. आता या प्रकरणी धक्कादायकबाब समोर आली आहे.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी जुहू परिसरातील एका पार्कजवळ टायगर श्रॉफ यांच्या कारवर सहा ते सात राउंड फायरिंग करण्यात आले. त्यावेळी टायगर गाडीतच बसलेला होता आणि सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या एनडीआर युनिटने २० ऑक्टोबर रोजी चार जणांना अटक केली. यामध्ये हरियाणातील २१ वर्षीय कुणाल आणि १९ वर्षीय सुमित तसेच उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय राधा व २३ वर्षीय बाबिता यांचा समावेश आहे. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(१)(बी) अंतर्गत कोर्टात हजर करण्यात आले.
वाचा: टायगर श्रॉफवर गोळीबार होताच Ex-Gf दिशा पटाणीने उचलले मोठे पाऊल, थेट…
एन्क्रिप्टेड अॅपवरून दोघांमध्ये संपर्क
महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशी आणि औपचारिक अटकेसाठी कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी या चौघांना औपचारिकरित्या अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर पडला होता. हरसाना गावातील एका मित्राच्या माध्यमातून त्याची अनिल पंडितशी ओळख झाली. त्यानंतर एन्क्रिप्टेड अॅपवरून दोघांमध्ये संपर्क सुरू झाला. अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरहून एक पिस्तूल आणि २० राउंड आणले. सुमितही त्याच्यासोबत अमृतसरला गेला होता.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने तिला आपल्या योजनांची माहिती देत संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिला शस्त्र मुंबईला नेण्यास तयार केले. १५ ऑक्टोबरला कुणालने राधा आणि बाबिताला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेले. पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड अॅपवरून अनिल पंडितच्या सूचनांनुसार संपर्कात होता.
१७ ऑक्टोबरला राधा आणि बाबिता मुंबईच्या दादर स्थानकावर उतरल्या. दादर परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्याच दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता एका अल्पवयीन मुलाने हॉटेलजवळ राधाकडून बॅग घेतली. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता टायगर श्रॉफ यांच्या कारवर गोळीबार झाला. त्यानंतर अनिल पंडितने कुणालला मुंबईत अडकलेल्या शूटर्सना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्याच दिवशी राधा आणि बाबिता दादरहून हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाल्या. २० ऑक्टोबरला त्यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले, तर कुणाल आणि सुमितला हरियाणातील सोनीपथून अटक करण्यात आली. या घटनेनंतर टायगर श्रॉफ यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातून हल्ल्याची भीषणता स्पष्ट होते. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेत आहेत.
