“टॉम क्रूझ भयंकर रागीट, तोंडावर फेकला अल्बम”; एक्स मॅनेजरने सांगितला किस्सा

| Updated on: Feb 21, 2022 | 6:29 PM

"मला नाही वाटत की टॉम (Tom Cruise) इतरांवर कधी प्रेम करू शकेल. तो फक्त स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर प्रेम करतो."

टॉम क्रूझ भयंकर रागीट, तोंडावर फेकला अल्बम; एक्स मॅनेजरने सांगितला किस्सा
Tom Cruise
Image Credit source: Instagram/Tom Cruise
Follow us on

हॉलिवूडचा (Hollywood Actor) अत्यंत लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूझ (Tom Cruise) हा त्याच्या लूक आणि अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र त्याच्या स्वभावाचा एक वेगळाच पैलू त्याची एक्स मॅनेजर एलीन बर्लिन (Eileen Berlin) हिने सर्वांसमोर आणला. करिअरच्या सुरुवातीला टॉम प्रचंड रागीट स्वभावाचा होता, असं ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली. इतकंच नव्हे तर एकदा एलीनने टॉमला वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून अल्बम दिला असता, रागाच्या भरात त्याने तोच अल्बम तिच्या चेहऱ्यावर फेकल्याची धक्कादायक घटना तिने सांगितली. टॉम १८ वर्षांचा असताना एलीनने त्याच्यासोबत काम केलं होतं. करिअरच्या कठीण काळात टॉमला आपल्या घरात राहण्याचीही संधी एलिनने दिली होती. जवळपास चार ते पाच वर्षे एलीनने टॉमची मॅनेजर म्हणून काम केलं होतं. ‘डेली मेल’ला दिलेल्या या मुलाखतीत ८६ वर्षीय एलीनने टॉमसोबतच्या कटू आठवणी सांगितल्या.

“टॉम त्याच्या दिसण्याबाबत अत्यंत सजग असायचा. किंबहुना सतत तो त्याविषयीच विचार करायचा. पहिल्या पब्लिसिटी फोटोशूटसाठी त्याने पोझ कसे द्यावे यासाठी दिवसभर सराव केला होता. तिरस्कार, अहंकार, निराशा.. या त्याच्या स्वभावाच्या सर्व पैलू मी पाहिल्या आहेत. पण त्याला अत्यंत आनंदीत असल्याचं मी कधीच पाहिलं नाही. मी त्याला टॉमी म्हणून हाक मारायचे. तो भयंकर तापट स्वभावाचा होता. अगदी क्षणभरात त्याला कसलाही राग येऊ शकतो. त्याला १९व्या वाढदिवसानिमित्त मी त्याला एक अल्बम दिला होता. त्यात त्याचेच पब्लिसिटी आर्टिकल्स होते. मात्र ते पाहून त्याचा राग अनावर झाला. मला असले अल्बम नकोत असं म्हणत त्याने रागाच्या भरात माझ्या तोंडावर अल्बम फेकला. तो अल्बम माझ्या गालावर लागला”, असं एलीनने सांगितलं.

टॉम लॉस एंजिलिसला गेल्यानंतर एलीनने त्याच्यासाठी काम करणं बंद केलं. मात्र त्यानंतर काही काळ त्याच्याशी संपर्कात राहिल्याचं एलीनने सांगितलं. टॉमच्या घटस्फोटांबद्दल ती पुढे म्हणाली, “मला नाही वाटत की तो इतरांवर कधी प्रेम करू शकेल. तो फक्त स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर प्रेम करतो. मला त्याची दया येते. तो एकटा पडेल असं वाटतं. जोपर्यंत तो काम करू शकेल तोपर्यंत तो ठीक असेल. पण काम बंद होईल तेव्हा तो काय करेल हे मलासुद्धा माहित नाही.”