‘या’ अभिनेत्रीच्या हत्येनं हादरलं होती बॉलिवूड इंडस्ट्री; सावत्र मुलांनीच घेतला जीव

प्रिया आणि चेतन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. म्हणूनच लग्न न करता आपल्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठ्या असलेल्या चेतन यांच्यासोबत ती त्याकाळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. चेतन त्यांची पत्नी उमापासून वेगळे राहायचे.

या अभिनेत्रीच्या हत्येनं हादरलं होती बॉलिवूड इंडस्ट्री; सावत्र मुलांनीच घेतला जीव
Priya Rajvansh
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 17, 2023 | 12:10 PM

मुंबई | 17 जुलै 2023 : फिल्म इंडस्ट्री ग्लॅमर आणि झगमगाटासाठी ओळखली जात असली तरी अनेकदा या ग्लॅमरमागे दु:ख आणि वेदना लपलेल्या असतात. पडद्यावर खळखळून हसणारे चेहरे खऱ्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत असतात. यापैकी काही कलाकारांचा मृत्यूसुद्धा अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक होता. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश. प्रेमात आकंठ बुडालेल्या या अभिनेत्रीच्या हत्येनं संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली होती. प्रियाचा जन्म 30 डिसेंबर 1936 रोजी शिमलामध्ये झाला होता. तिचं खरं नाव वीरा सुंदर सिंह असं होतं. शालेय शिक्षणानंतर प्रिया उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. लंडनमधील तिच्या एका फोटोवरून तिला चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते.

रणवीर सिंह नावाच्या एका व्यक्तीने प्रियाची भेट देवानंद यांचे भाऊ चेतन आनंद यांच्याशी करून दिली आणि इथूनच तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. चेतन आनंद यांनी प्रियाला 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील मैत्री वाढू लागली होती. त्यावेळी चेतन हे त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते. त्यामुळे प्रिया आणि त्यांच्यातील जवळीक वाढली होती. हळूहळू प्रियाच्या प्रेमात ते इतके वेडे झाले होते की कोणत्या दुसऱ्या दिग्दर्शकासोबत ते तिला काम करू द्यायचे नाहीत.

1970 मध्ये राजकुमार यांच्यासोबत प्रदर्शित झालेल्या ‘हीर रांझा’ या चित्रपटामुळे प्रिया इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने ‘हंसते जख्म’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘कुदरत’, ‘साहेब बहादूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1985 मध्ये प्रियाने ‘हाथों की लकीरें’ या चित्रपटात काम केलं होतं आणि हाच तिचा अखेरचा चित्रपट ठरला होता.

प्रिया आणि चेतन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. म्हणूनच लग्न न करता आपल्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठ्या असलेल्या चेतन यांच्यासोबत ती त्याकाळी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. चेतन त्यांची पत्नी उमापासून वेगळे राहायचे. त्यामुळे प्रिया त्यांची पत्नीसारखीच काळजी घ्यायची. मात्र 1977 मध्ये चेतन आनंद यांच्या निधनाने ती पूर्णपणे खचून गेली. चेतन यांना केतन आणि विवेक अशी दोन मुलं होती. या दोन्ही मुलांसोबत प्रिया आपुलकीने राहायची.

चेतन यांच्यासाठी प्रियाच सर्वस्व होती. म्हणूनच जेव्हा त्यांचं मृत्यूपत्र समोर आलं तेव्हा त्यांची संपत्ती तीन भागांमध्ये विभागून देण्यात आली होती. त्यातील दोन भागांवर दोन्ही मुलांचा आणि तिसऱ्या भागावर प्रियाचा हक्क होता. मात्र चेतन यांचं हेच प्रेम तिच्यासाठी मोठी समस्या बनेल हे प्रियाला माहीत नव्हतं. 27 मार्च 2000 रोजी चेतन आनंद यांच्या जुहू इथल्या बंगल्यात प्रियाचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यूप्रकरणी विविध चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. मात्र तिची गळा दाबून हत्या झाल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती.

चेतन आनंद यांची मुलं केतन आणि विवेक यांनी कर्मचारी माला आणि अशोक यांच्या मदतीने प्रियाची हत्या केली होती. आरोपींना याप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र 2002 मध्ये मुलांना जामिन मिळाला आणि त्याप्रकरणाची सुनावणी अद्याप सुरूच आहे.