‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ गाण्याचा आवाज हरपला; गायक अनुप घोषाल काळाच्या पडद्याआड

| Updated on: Dec 16, 2023 | 12:30 PM

अनुप घोषाल यांचं पार्श्वगायन असलेल्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये 'फुलेश्वरी', 'मर्जिना अब्दल्ला' आणि 'छद्मबेशी' यांचाही समावेश आहे. मात्र गुलजार दिग्दर्शित 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' या त्यांच्या गाण्याने देशभरातील श्रोत्यांची मनं जिंकली.

तुझसे नाराज नहीं जिंदगी गाण्याचा आवाज हरपला; गायक अनुप घोषाल काळाच्या पडद्याआड
अनुप घोषाल
Image Credit source: Instagram
Follow us on

कोलकाता : 16 डिसेंबर 2023 | प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अनुप यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असंख्य चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनुप हे वृद्धापकाळातील आजारपणामुळे दक्षिण कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. अनुप यांना दोन मुली आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणं गायलेल्या अनुप घोषाल यांच्या निधनावर मी दु:ख आणि सहवेदना व्यक्त करते’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. अनुप घोषाल यांनी संगीतविश्वात आपली दमदार छाप सोडली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपाडा मतदारसंघातून 2011 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात यशस्वी पाऊल टाकलं होतं.

हे सुद्धा वाचा

अनुप यांचा जन्म 1945 मध्ये अमूल्य चंद्र घोषाल आणि लावण्या घोषाल यांच्या घरी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी संगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, कोलकाताच्या मुलांचा कार्यक्रम शिशु महलसाठी गाणं गायलं होतं. त्यांच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप है, इश्क भी आप है’ आणि ‘शिशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर के लिए’ यांचा समावेश आहे. हिंदी आणि बंगालीसह त्यांनी इतरही भाषांमध्ये दमदार गाणी गायली आहेत.

काझी नजरुल इस्लाम, रवींद्रनाथ टागोर आणि आधुनिक बंगाली गाण्यांमध्ये अनुप यांनी प्रतिभा सिद्ध केली होती. याशिवाय त्यांनी रे यांच्या ‘गुपी गायने बाघा बायने’ आणि ‘हिरक राजार देशे’ या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या ‘सगीना महतो’ या चित्रपटातही त्यांनी गाणं गायलं होतं.