OTT: तुंबाडची मंजुळा, भूतम भयम.. ओटीटीवर एकापेक्षा एक जबरदस्त कंटेट, कुठे पाहू शकता?
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मराठीतील काही दमदार चित्रपट आणि वेब सीरिज लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहेत. ते कोणते, जाणून घ्या..

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यात मराठी चित्रपट आणि वेब सीरिजलाही मोठी पसंती मिळते. प्रेक्षकांकडून मिळालेली पसंती, वाढती प्रेक्षकसंख्या आणि ओरिजिनल कंटेट यांमुळे Zee5चं पहिलं वर्ष उल्लेखनीय ठरलं. या यशानंतर आता दुसऱ्या वर्षातही दमदार कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी5 च्या या नव्या कंटेंटमध्ये लोकप्रिय फ्रँचाइजी, नवीन ओरिजिनल सीरिज, थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट, चित्रपटगृहांमधील यशस्वी प्रदर्शनानंतर होणारे डिजिटल प्रीमियर्स आणि लाइव्ह स्पोर्ट्स यांचा समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत निर्मात्यांच्या कलाकृतींनाही या प्लॅटफॉर्मवर स्थान देण्यात येणार आहे.
‘हे काय नवीन?’, ‘देवखेळ’चा दुसरा सिझन
बहावा एंटरटेनमेंटची ‘हे काय नवीन?’ ही सीरिज दुसऱ्या सिझनसह परत येत असून उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर ‘देवखेळ’च्या सिझन 2 मध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. याशिवाय नव्या ओरिजिनल्सचाही वैविध्यपूर्ण कंटेंट सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये भरत जाधव, शर्वरी जमेनीस, पुष्कर श्रोत्री आणि शिवानी रांगोळे यांच्या भूमिका असलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ तसंच ‘112’चा समावेश आहे. ‘112’ची निर्मिती निखिल महाजन यांनी केली असून, जीविषा काळे आणि रोहित सातपुते यांनी दिग्दर्शन केलं आहे.
मराठी सिनेमे
सीरिजच्या या दमदार कंटेंटसोबतच विविध जॉनर आणि फॉरमॅटमधील चित्रपटांचाही तितकाच महत्त्वाकांक्षी कंटेंट सादर करण्यात येणार आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर Zee 5वर प्रीमियर होणाऱ्या चित्रपटांमध्ये झी स्टुडिओजच्या ‘तुंबाडची मंजुळा’चा समावेश असून, त्यामध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि ओम भुतकर यांच्या भूमिका आहेत. तसंच नील सालेकर, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, सौरभ घाडगे आणि करण सोनावणे यांच्या भूमिका असलेला ‘भूतम् भयम्’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय मंगेश पवार कंपनीच्या ‘अडकित्ता’ या ओरिजिनल चित्रपटाचा प्रीमियरही होणार असून, सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दमदार कंटेंट
प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी ‘हसवा हसवी – द मराठी स्टँड-अप शो’ हा कॉमेडी स्पेशल सादर करण्यात येणार आहे. या शोमध्ये अनिश गोरेगांवकर, फातिमा आयेशा, संकेत जोशी, साहिल होराणे आणि साहिल शेख यांचा सहभाग आहे. प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लायब्ररीमध्ये ‘गरुड’, ‘विक्रम वेताळ’, ‘शिव सती’, ‘चंद्रकांता’, ‘तिरुपती बालाजी’, ‘नर्मदा’, ‘राम अंजनेय युद्ध’ आणि ‘बर्बरिक’ यांसारख्या प्रीमियम एआय टायटल्सचा समावेश आहे. मनोरंजनाच्या या कंटेंटसोबतच लाइव्ह स्पोर्ट्सची व्याप्तीही वाढवण्यात येत असून, त्यामध्ये ‘फिफा’, ‘बुंडेसलिगा’, ‘सीरी ए’ आणि ‘आयएलटी20’ यांसारख्या प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.
ओरिजिनल सीरिज आणि चित्रपटांपासून चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर होणारे डिजिटल प्रीमियर, एआय आणि कॉमेडीपासून लाइव्ह स्पोर्ट्सपर्यंत विविध प्रकारचा कंटेंट मराठी Zee 5वर सातत्याने सादर करण्यात येत आहे. Zee 5 हा भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून, दक्षिण आशियाई कंटेंट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे जागतिक पातळीवरील व्यासपीठ आहे. Zee 5ची सेवा 190हून अधिक देशांमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे.