शाहरुख असो किंवा कुठलाही खान.. ‘पठाण’विरोधात मुस्लिम संघटनाही आक्रमक

शाहरुखच्या 'पठाण'विरोधात मुस्लिम संघटनांचा इशारा; म्हणाले "हा अपमान.."

शाहरुख असो किंवा कुठलाही खान.. पठाणविरोधात मुस्लिम संघटनाही आक्रमक
Pathaan Movie
| Updated on: Dec 16, 2022 | 9:58 AM

मध्यप्रदेश: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटावरील वाद दिवसेंदिवस वाढतच जातोय. मध्यप्रदेशमध्ये हिंदू संघटनांनंतर आता मुस्लिम संघटनांनीही चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. पठाण या चित्रपटाला राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा उलेमा बोर्डने दिला. तर दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीनेही चित्रपटाचा विरोध केला आहे. मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण देशात ‘पठाण’ प्रदर्शित होऊ देणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

पठाण या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिकाने केसरी रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे वादाला सुरुवात झाली. या गाण्यात शाहरुखनेही काही बोल्ड सीन दिले आहेत. भगवा रंग वापरत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. तर यातील काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे.

शाहरुख, दीपिकाचे पुतळे जाळले

बुधवारी या चित्रपटाविरोधात इंदूरमध्ये काही लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शाहरुख, दीपिकाचे पुतळे जाळले. सोशल मीडियावरही पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी सातत्याने केली जातेय. मध्यप्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही म्हटलंय की निर्मात्यांनी ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाचे कपडे आणि काही सीन्स दुरुस्त केले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

“संपूर्ण देशात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”

उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनीसुद्धा ‘पठाण’वर आक्षेप घेतलाय. “या चित्रपटातून मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. केवळ मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण देशात आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पठाण हा मुस्लिम समुदायातील सर्वांत सन्मानित समुदाय आहे. या चित्रपटात केवळ पठाणच नाही तर सर्व मुस्लिम समुदायाची बदनामी करण्यात आली. चित्रपटाचं नाव पठाण आहे आणि त्यात महिला अश्लील डान्स करताना दिसत आहेत”, असं ते म्हणाले.

निर्मात्यांनी पठाण हे नाव हटवावं आणि त्यानंतर पाहिजे ते करावं अशी मागणी सैय्यद अनस अली यांनी केली. इतकंच नव्हे तर याविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

24 तासांत 400 हून अधिक कॉल्स

दुसरीकडे AIMTC यांनीसुद्धा ‘पठाण’चा विरोध केला. ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटीचे अध्यक्ष परिजादा खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की या चित्रपटातून मुस्लिमांच्या भावनांना भडकावलं गेलंय. आपल्याला 24 तासांत 400 हून अधिक कॉल्स आल्याचं त्यांनी सांगितलं. शाहरुख खान असो किंवा मग दुसरा कुठलाही खान.. मुस्लिम धर्माचा अपमान होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.