
अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज (रविवारी) निधन झालं. त्या 91 वर्षांच्या होत्या. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील.

माधुरीने अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. माधुरी ही स्नेहलता यांची कार्बन कॉपीच असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी त्यावर दिली.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुलाब गँग' या चित्रपटासाठी स्नेहलता यांनी मुलीसोबत मिळून गाणं रेकॉर्ड केलं होतं.

"आम्ही जेव्हा माधुरीला या चित्रपटासाठी गाणं गाण्यास सांगितलं, तेव्हा ती आनंदाने तयार झाली होती. रेकॉर्डिंगला येताना माधुरीने आईलाही सोबत आणलं होतं. त्यावेळी आम्हाला समजलं की त्यासुद्धा उत्तम गायिका आहेत. तेव्हा आम्ही स्नेहलता यांना विचारलं की तुम्हीसुद्धा चित्रपटासाठी गाणं गाऊ शकाल का? अखेर गुलाब गँग चित्रपटासाठी माधुरी आणि तिच्या आईने मिळून गाणं रेकॉर्ड केलं", असा किस्सा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी सांगितला होता.

माधुरी विविध मुलाखतींमध्येही तिच्या आईविषयी अनेकदा व्यक्त झाली. आईने ज्याप्रकारे मला लहानाचं मोठं केलं, जी शिकवण दिली त्यामुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्या स्टारडमचा खासगी आयुष्यावर परिणाम झाला नाही, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.

आजवर मी जे काही आहे आणि यापुढेही मी जे असेन, ते तुझंच प्रतिबिंब असेन, अशी पोस्ट एकदा माधुरीने तिच्या आईसाठी लिहिली होती.