‘मागच्या जन्मात साप होती का?’, रवी किशनच्या मुलीवर उर्फी जावेद संतापली; नेमकं प्रकरण काय?
Urfi Javed : अलायन्स या रिअॅलिटी शो डॉली जावेद बाहेर पडली आहे. यानंतर आता तिची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. या दोघींनी रवी किशनच्या मुलीवर टीका केली आहे.

कुणाल खेमू होस्ट असलेल्या अलायन्स या रिअॅलिटी शो डॉली जावेद बाहेर पडली आहे. यानंतर आता तिची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शोमधील एक क्लिप पाहिल्यानंतर उर्फीने अभिनेता रवि किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या क्लिपमध्ये रीवाच्या बोलण्यात आणि कृतीत विरोधाभास दिसून आल्याचा आरोप उर्फीने केला आहे.
उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रीवा किशन डॉली जावेदबद्दल बोलताना दिसते. रीवा म्हणते की, डॉलीला गेममध्ये पुढे राहण्याची संधी मिळायला हवी होती. तसेच, दोघींमधील मैत्री आणि नातेसंबंधाचाही ती उल्लेख करते. मात्र, उर्फीच्या मते अशा भावना व्यक्त करूनही रीवा ही डॉलीला शोमधून बाहेर काढण्यासाठी मतदान करणाऱ्या स्पर्धकांपैकी एक होती. यामुळे तिने नाराजी व्यक्त केली आहे.
उर्फीने रीवाला साप म्हटले
या क्लिपवर प्रतिक्रिया देताना उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रीवाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने हा दुटप्पीपणा असल्याचे म्हणत व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मागच्या जन्मी साप होतीस का? डॉली जावेदनेही यावर प्रतिक्रिया देत, मला इथे एक साप दिसतोय, असे लिहिले आणि त्यासोबत अनेक सापांचे इमोजी पोस्ट केले.
डॉलीच्या एलिमिनेशनची चर्चा
अलायन्समधून डॉली जावेद बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक प्रेक्षकांनी मतदानाचा निर्णय योग्य होता का, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच उर्फीच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे या वादाला आणखी रंग चढला आहे.
कुशल टंडनवर केली होती टीका
अलायन्समधील आपल्या प्रवासात डॉली जावेदने आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. शोदरम्यान डॉलीने अनेकदा कुशल टंडनच्या महिलांबाबतच्या कथित चुकीच्या वागणुकीवर आणि चर्चेदरम्यान इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नांवर टीका केली होती. विरोध असूनही तिने कधीही माघार घेतली नाही आणि ठामपणे आपले मत मांडत राहिली.
डॉलीने हेही सांगितले की, ‘मी अशा कुटुंबातून आली आहे जिथे महिलांना गप्प बसवणे किंवा त्यांचा अपमान सहन केला जात नाही. त्यामुळे घरातील दबाव असो किंवा मतभेद, मी नेहमीच स्वतःच्या हक्कासाठी आणि मतासाठी लढत राहणार.’