
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेजने अभिनेत्री लावण्या त्रिपाठीशी इटलीत लग्न केलं. या लग्नसोहळ्याला जवळचे कुटुंबीय आणि पाहुणे उपस्थित होते. इटलीतील टस्कनीमध्ये बोर्गो सॅन फेलिस याठिकाणी दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार हे लग्न पार पडलं.

वरुण आणि लावण्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लावण्याने लाल रंगाची साडी नेसली होती. तर वरुणने धोती-शेरवानीला पसंती दिली. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ज्याठिकाणी लग्न केलं होतं, तिथेच हे लग्न पार पडलं.

वरुण तेज हा मेगास्टार चिरंजीवी आणि साऊथ सुपरस्टार पवन कल्याण यांचा भाचा आहे. रामचरण, अल्लू अर्जुन, अल्ली सीरिश, साई तेज हे सर्व त्याची चुलत भावंडं आहेत. हे सर्वजण वरुण आणि लावण्याच्या लग्नात सहभागी झाले होते.

वरुणने विंटेज कारमध्ये लग्नमंडपात एण्ट्री केली. त्यानंतर ढोलच्या गजरावर सर्वांनी ठेका धरला. 30 ऑक्टोबरपासून लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले होते. कॉकटेल नाइटनंतर हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

वरुण आणि लावण्या गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याच वर्षी दोघांचा साखरपुडा पार पडला. इटलीतील लग्नानंतर हैदराबादमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे. वरुण तेज हा दाक्षिणात्य अभिनेते नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे.