विकी कौशल ‘या’ गंभीर आजारातून बाहेर आलाय; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद

बॉलीवूडमधील स्टार विकी कौशलची सध्या त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण हे फारच कमी लोकांना हे माहिती असेल की विकी कौशल एका गंभीर आजारातून बाहेर आला आहे. या आजारात त्याला हातपाय उचलणेही कठीण झाले होते.

विकी कौशल या गंभीर आजारातून बाहेर आलाय; हातपाय उचलणे देखील झाले होते बंद
Vicky Kaushal sleep paralysis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 2:02 PM

बॉलीवूडमध्ये सध्या कोणत्या अभिनेत्याची हवा असेल तर तो अभिनेता विकी कौशल आहे. विकी कौशलने त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वांच्या मनात स्वत:ची अशी खास जागा निर्माण केली आहे. चित्रपटाचं तर कौतुक होतचं आहे सोबतच विकीच्या अभिनयाचं कौतुक करताना चाहते थांबत नाहीयेत. विकीने त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून सर्वांनाच त्याने चकित केलं आहे. या चित्रपटानंतर तर त्याचा चाहतावर्गही प्रचंड वाढला आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सर्चही केल्या जात आहेत.

विकी नेमक्या कोणत्या आजाराने त्रासलेला होता?

पण बऱ्याच चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की तो एका गंभीर आजारातून बाहेर आला आहे. होय, त्याला एका दुर्धर आजाराने ग्रासलं होतं, ज्यामुळे त्याचे हातपाय देखील कम करायचे बंद झाले होते. विकी कौशलने स्वतः एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली. विकी नेमक्या कोणत्या आजाराने त्रासलेला होता? आणि हा आजार किती गंभीर स्वरूपाचा असतो, तसेच त्यावर कोणते उपाय आहेत? या सर्वांबद्दल जाणून घेऊयात.

विकी कौशलला कोणता आजार झाला होता?

विकी कौशलला स्लीप पॅरालिसिस नावाचा एक गंभीर आजार होता, ज्यामध्ये व्यक्ती झोपेच्या वेळी काहीही हालचाल करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही. विकीने स्वतः या आजाराची माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली. विकिने सांगितलं की, त्याच्यासाठी हा खूप भयानक अनुभव होता. पण त्यावर मात करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही तो म्हणतो.

स्लीप पॅरालिसिस म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणे आणि उपाय काय?

स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय?

हा एक झोपेचा आजार आहे. हे झोपेच्या पद्धती बदलल्यामुळे होऊ शकतो. यामध्ये, असे वाटते की ती व्यक्ती झोपेतून जागी तर झाली आहे, पण अंथरूणावर उठू शकत नाही, अगदी कोणतेही काम करू शकत नाही. ही अशी स्थिती असते, ज्यात खूप प्रयत्न करूनही व्यक्तीला हात-पाय हलवता येत नाहीत. यासोबतच, या आजारादरम्यान, व्यक्तीला झोपेत उंच ठिकाणाहून पडणे, पाण्यात बुडणे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अशा भयानक गोष्टी दिसतात.

स्लीप पॅरालिसिस कशामुळे होतो?

स्लीप पॅरालिसिस झोपेच्या विकारांपैकी एक आजार असल्यामुळे यात मोठे कारण म्हणजे झोपेचा अभाव. तसेच झोपण्याच्या पद्धतीत बदल, मादक पदार्थांचे सेवन जास्त केल्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त ताण घेणे, पॅनिक डिसऑर्डर आणि मेंदूवर जास्त दबाव आल्याने देखील हा आजार उद्भवू शकतो.

स्लीप पॅरालिसिसवर उपाय काय?

स्लीप पॅरालिसिसच्या बाबतीत बिघडलेली जीवनशैली सुरळीत करणे आणि चांगली झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात निरोगी दिनचर्यांचा समावेश करून जास्तीतजास्त विश्रांती घेणे महत्त्वाचे. मानसिक शांतीसाठी ध्यान करणे, आनंद वाटेल अशा गोष्टीमध्ये मन रमवणे, पोषक आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सर्वा गोष्टींवर जोर देणे गरजेचे आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्त्रोतांवरून घेण्यात आली आहे. हा कोणत्याही वैद्यकीय मताचा पर्याय नाही. त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.)