लेक गेल्यानंतर अभिनेत्याचं आयुष्यच बदललं; चप्पल घालणं सोडलं, पत्नीचा भावनिक खुलासा, ‘आजही तिचं घड्याळ..’
पोटची पोरगी गमावल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. मुलीच्या आठवणीत आता तो चप्पल, शूज वगैरे काहीच घालत नाही. लेक कॉलेजला जायच्या तयारीत असताना त्याने तिच्यासाठी अनेक ठिकाणांहून चप्पल खरेदी केले होते.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार विजय अँटनी सध्या त्याच्या आगामी ‘अप्पा कुट्टी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याची पत्नी फातिमा विजय अँटनी हिने केलेल्या एका खुलाशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. 2023 मध्ये आपल्या मोठ्या मुलीला गमावल्यानंतर विजय अँटनीने आयुष्यात अनेक बदल केले आहेत. त्याने चप्पल आणि बूट घालणं बंद केलं असून, महागड्या घड्याळांचाही त्याग केला आहे. यामागचं कारण सांगताना फातिमा भावूक झाली. मुलीच्या आठवणी जपण्यासाठी विजयने घेतलेला हा निर्णय ऐकून चाहत्यांनाही भावना अनावर झाल्या आहेत.
मुलीच्या आठवणीसाठी आयुष्यभर अनवाणी राहण्याचा निर्णय
विजय अँटनी आणि फातिमा यांच्या ‘अप्पा कुट्टी’ या आगामी चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी फातिमाने विजय चप्पल का घालत नाही, यामागचं कारण सांगितलं. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव मीरा होतं. मीरा कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना तिच्यासाठी फातिमाने अमेरिका, लंडन यांसारख्या ठिकाणांहून अनेक चप्पल आणि बूट खरेदी केले होते. मात्र, मीराच्या निधनानंतर हे सर्व पादत्राणं घरात तसेच पडून आहेत. ही पादत्राणं पाहून विजय अँटनीला मुलीची आठवण येते. त्यामुळे त्याने यापुढे आयुष्यात कधीही चप्पल किंवा बूट घालणार नसल्याचा निर्णय घेतला. फातिमाने सांगितलं की, परदेशात संगीताचे कार्यक्रम असताना सुरक्षेच्या किंवा इतर कारणांमुळे पादत्राणं घालणं आवश्यक असतं. अशा वेळी विजय ती घालतो. मात्र, कार्यक्रम संपताच तो लगेच बूट काढून टाकतो.
महागडी घड्याळं सोडली, आता वापरतो मुलीचं घड्याळ
विजय अँटनीकडे एकेकाळी राडो आणि रोलेक्स यांसारख्या महागड्या ब्रँडची घड्याळं होती. मात्र, मुलीच्या निधनानंतर त्याने या घड्याळांचा वापर करणं बंद केलं. आता तो केवळ मीराचं घड्याळ वापरतो. मीराच्या मनगटावर निधनाच्या वेळी जे घड्याळ होतं, तेच घड्याळ विजय आजही घालतो. फातिमाने सांगितलं की, मीराला आवडत असल्यामुळे तिने तिच्यासाठी हे घड्याळ खरेदी केलं होतं. त्याची किंमत अवघी चार हजार रुपये होती. अनेकदा विजयला स्मार्टवॉच वापरण्याचा सल्ला दिला, पण तो ऐकत नाही.
मुलीच्या निधनानंतर पहिल्यांदाच फातिमा सार्वजनिक कार्यक्रमात
मीराच्या निधनानंतर फातिमाने चित्रपटसृष्टीतील कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवलं होतं. जवळपास पाच वर्षांनंतर ती ‘अप्पा कुट्टी’च्या प्री-रिलीज कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी ती भावूक झाली. मुलीला गमावल्यानंतर आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलो होतो. मात्र, विजय आणि चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळालं, असं तिने सांगितलं. या कार्यक्रमात विजय आणि फातिमा यांची धाकटी मुलगी लाराही उपस्थित होती. तिने वडिलांच्या मेहनतीचं कौतुक करत ‘अप्पा कुट्टी’ हा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित चित्रपट असल्याचं सांगितलं.
विजय अँटनी आणि फातिमा यांची मोठी मुलगी मीरा अँटनी हिचं 19 सप्टेंबर 2023 रोजी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी निधन झालं. चेन्नईतील अलवरपेट इथल्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा त्यावेळी नैराश्याचा सामना करत होती. त्यासाठी तिच्यावर उपचारही सुरू होते.