लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्…; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!

| Updated on: Mar 16, 2021 | 4:53 PM

लावणी, लोकगीते आणि प्रसिद्ध गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे हे एक समीकरणच झालं आहे. (vitthal shinde was sung first song with lata mangeshkar)

लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्...; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!
vitthal shinde
Follow us on

मुंबई: लावणी, लोकगीते आणि प्रसिद्ध गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे हे एक समीकरणच झालं आहे. पण विठ्ठल शिंदे यांनी सिनेमांमधूनही पार्श्वगायन केलं आहे हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. एवढंच नव्हे तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतही त्यांनी गाणं गायलं आहे. लतादीदींसोबत गाणं गाण्याची संधी कशी मिळाली याचा विठ्ठल शिंदे यांनीच सांगितलेला हा किस्सा. (vitthal shinde was sung first song with lata mangeshkar)

अन् पावनखिंड मिळाला

विठ्ठल शिंदे यांची गायक आणि संगीतकार म्हणून ओळख निर्माण झाली होती. त्यावेळी दादर येथील प्लाझा सिनेमासमोरच्या खांडके बिल्डिंगमध्ये राहणारे तबलावादक मारोती किर यांनी शिंदे यांची संगीतकार वसंत प्रभू यांच्याशी ओळख करून दिली होती. वसंतरावांनी तीन महिन्यानंतर शिंदे यांना बोलावून ‘पावनखिंड’ या सिनेमात गाण्याची संधी दिली. वसंतरावांनी शिंदेंच्या गाण्याची रिहर्सल घेतली. त्यांना ध्रृवपद शिकवलं आणि लगेचच दुसरा अंतरा शिकवून तिसरा अंतरा अर्धवटच शिकवला. आपल्याला संपूर्ण गाणं का शिकवलं नाही? काही अडचण झालीय का? या विचाराने शिंदे अस्वस्थ झाले. मात्र हे ड्युएट साँग असेल या विचाराने शिंदे यांनी वसंतरावांना विचारण्याची हिंमत केली नाही.

लतादीदींशी ओळख झाली अन्

त्यानंतर ताडदेवच्या फेमस स्टुडिओत रेकॉर्डिंग होती. त्याकाळी गाणं संपूर्ण पाठ करून तिथल्या तिथेच म्हणावे लागायचे. तेव्हा डबिंग वगैरे प्रकार नव्हता. गाणं रेकॉर्ड होण्याच्या अर्धा तास आधी तिथे लता मंगेशकर आल्या. त्यानंतर वसंतरावांनी शिंदे तुमच्यासोबत गाणार आहेत, असं लतादीदींना सांगितलं. हे ऐकून शिंदेंच्या मनात धडकीच भरली. त्यांनी बिचकत बिचकतच गायनाला सुरुवात केली. लतादीदींच्या हे लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी रेकॉर्डिंग थांबवलं आणि शिंदेंना धीर दिला. ‘अवसान गाळू नका. हवं तर आपण दहादा रिहर्सल करू. पण जोमानं गाऊ’, असं लतादीदी म्हणाल्या. लतादीदींनी धीर देताच मग शिंदे यांनीही मनसोक्तपणे आणि तन्मयतेने गाणं गायलं आणि रेकॉर्डिंग पूर्णही केलं. शिंदे यांनी लतादीदींसोबत गायलेलं ते गाणं होतं…

कुणी काही म्हणा हो काही म्हणा,
आम्ही सोडू कधी ना पोरपणा…

पहिल्याच प्रयत्नात लतादीदींसोबत गायनाची संधी

विठ्ठल शिंदे यांचं वैशिष्ट्ये म्हणजे सिनेमा क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर पहिलंच गाणं लतादीदींसोबत गायनाची त्यांना संधी मिळाली. विशेष म्हणजे लतादीदींसोबत गाणारे ते पहिले आंबेडकरी गायक होते. तसेच गाण्याची रेकॉर्ड निघालेले ते पहिलेच आंबेडकरी गायकही आहेत. ‘पावनखिंड’च्या या गाण्यासाठी त्यांना 300 रुपयांची बिदागी मिळाली होती. त्यानंतर त्यांना अनंत माने यांच्या सांगते ऐका आणि धाकटी जाऊ या दोन सिनेमातही गाण्याची संधी मिळाली होती.

आशा भोसलेंबरोबर गाण्याची संधी

लतादीदींसोबत गाण्याची संधी मिळाल्यानंतर ‘धाकटी जाऊ’ सिनेमात शिंदे यांना गाण्याची संधी मिळाली. या सिनेमात त्यांना आशा भोसलेंसोबत गाण्याची संधी मिळाली. मार लागल्याने चेहरा सुजलेला असतानाही त्यांनी गाणं गायलं होतं. त्यावेळी गाण्यावरील शिंदे यांच्या प्रेमाचं आशाताईंनी तोंडभरून कौतुक केलं होतं. आशाताईंबरोबर गायलेलं गाणं होतं…

सजना थांबू का सांग घरी जाऊ रे
सांज झाली मी वाट किती पाहू रे…

या गाण्यानंतर शिंदे यांनी आशा भोसले यांच्यासोबत ‘सांगत्ये ऐका’मध्येही एक गाणं गायलं होतं. ‘सांगत्ये ऐकाम’ध्ये त्यांनी एकूण तीन गाणे गायले होते. ही सर्व गाणी त्यावेळी हिट झाली होती. त्यामुळे शिंदे यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. (साभार, आंबेडकरी कलावंत) (vitthal shinde was sung first song with lata mangeshkar)

संबंधित बातम्या:

वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(vitthal shinde was sung first song with lata mangeshkar)