वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आणि लावणी गायनप्रकारात अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे. (Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

वाचता येत नव्हतं, तरीही 'येऊ कशी कशी मी नांदायला' गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?
roshan satarkar-vitthal shinde

मुंबई: महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आणि लावणी गायनप्रकारात अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे. पण त्यातील गायक, संगीतकार विठ्ठल शिंदे यांचं योगदान खूप मोठं आहे. विठ्ठल शिंदे यांनी अनेक कलाकारांना मुख्य प्रवाहात आणले. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रोशन सातारकर त्यापैकी एक. रोशनबाईंनी विठ्ठल शिंदेंचं ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ हे गाणं गायलं आणि रातोरात लोकप्रिय झाल्या. आजही हे गाणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाजत असतं. या गाण्याचा किस्साही तसाच अफलातून आहे. विठ्ठल शिंदे यांनी हयात असताना सांगितलेला हा किस्सा त्यांच्याच शब्दात… (Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

सासुरवाडीला गेले आणि…

विठ्ठल शिंदे हे एकदा पुण्याला सासुरवाडीला गेले होते. त्यावेळी घरात बसून गाण्याची चाल बांधत असताना श्रावण गायकवाड नावाचा एक तरुण आला. त्याने आपण कवी असल्याचं सांगून शिंदेंसमोर गाण्याची आणि लावण्यांची चोपडी सरकवली. त्यातच ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ हे गाणं होतं. शिंदेंना हे गाणं आवडलं. या गाण्याला चार चालीही लावल्या. पत्नीला या चारही चाली ऐकवल्या. पण त्यांच्या पत्नीला या चारही चाली आवडल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी या गाण्याला पाचवी चाल लावली. चाल उत्तम होती. पत्नीने त्यांना हीच चाल कायम ठेवायला सांगितली.

सुलोचनाबाईंच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करण्यास नकार

पाचवी चाल ठरल्यानंतर शिंदे हे गाणं घेऊन रेकॉर्डिंगला गेले. त्यांना हे गाणं लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात रेकॉर्ड करायची होती. पण कंपनीच्या नियमांमुळे कंपनीने ही गाणी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यास नकार दिला. त्यानंतर ही लावणीही अडगळीत पडली.

तमाशाच्या बारीवर गेले आणि आवाज सापडला

पुढे काही महिन्यानंतर शिंदे यांना कुलकर्णी नावाचे गृहस्थ भेटले. या गृहस्थाला तमाशाचे प्रचंड वेड होतं. तमाशाच्या नव्या बारीवर त्याचे लक्ष असायचे. कामाठी पुऱ्यात पिला हाऊसला बॉम्बे थिएटरमध्ये तमाशाचा नवा फड आला होता. त्यात एक नवीन गायिका होती, तिचा आवाज प्रचंड चांगला होता. कुलकर्णी यांनी या गायिकेचा आवाज ऐकण्याचा आग्रह शिंदेंना केला आणि त्यांना तमाशाला घेऊन गेले. पाचव्या बारीचा तमाशा सुरू झाला. तमाशाचे नाव होते ‘रुक्मिनी ऊर्फ रोशन सातारकर’. तमाशानंतर शिंदे आणि कुलकर्णी रोशनबाईंना भेटायला गेले. कुलकर्णी यांनी रोशनबाईंना शिंदेंचा परिचय करून देताच रोशनबाईंनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि आमच्या आवाजाचा उपयोग करा, अशी विनंती केली. या प्रकाराने शिंदेही भांबावून गेले. मात्र, रोशनबाईंचा आवाज चांगला असल्याने सांगेल तसं गायची अट घालूनच शिंदे यांनी रोशनबाईंना गाण्याची संधी दिली.

गाणं मिळालं, पण वाचता कुठे येतंय?

त्यानंतर तीन दिवसाने विठ्ठल शिंदे हे रोशनबाईंना भेटले. त्यांच्यासमोर ‘येऊ कशी कशी मी नांदायला’चा कागद दिला अन् रिहर्सल सुरू केली. हातात कागद आल्यावर रोशनबाई अवाक् झाल्या. हे काय आहे? असा सवाल त्यांनी शिंदेंना केला. त्यावर हे गाणं असल्याचं त्यांनी रोशनबाईंना सांगितलं. पण मला तर वाचताच येत नाही, असं रोशनबाईंनी सांगताच शिंदे गर्भगळीत झाले. तरीही त्यांनी रोशनबाईंकडूनच गाणं गाऊन घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी रोशनबाईंकडून एक एक शब्द पाठ करून घेतला आणि गाण्याची रिहर्सल केली. दहा-बारा दिवस नव्हे तर दोन महिने ही रिहर्सल सुरू होती.

रोशनबाईंच्या आवाजातही गाणं रेकॉर्ड करण्यास नकार

दोन महिन्याच्या रिहर्सलनंतर गाणं चांगलं बसलं. त्यानंतर ते रोशनबाईेना घेऊन गाणं रेकॉर्ड करण्यासाठी घेऊन गेले. सुरुवातीला रेकॉर्डिंग अधिकाऱ्याने नवख्या गायिकेकडून गाणं रेकॉर्ड करून घेण्यास नकार दिला. पण शिंदेंच्या आग्रहापुढे अधिकारी नरमला आणि गाणं रेकॉर्ड झालं.

गाणं आलं, पण खप होईना

रोशनाबाईच्या आवाजात ‘येऊ कशी कशी…’ रेकॉर्ड झालं पण हे गाणं काही चाललं नाही. 15 दिवस झाले तरी गाण्याचा खप होत नव्हता. कंपनीवालेही हैराण झाले होते. त्यांनी मला बोलावून घेतले आणि कैफियत मांडली. तेव्हा मी त्यांना हे गाणं आकाशवाणीवर वाजवण्याचा सल्ला दिला आणि ही मात्रा लागू पडली. गाणं हिट झालं. खपाचा उच्चांक झाला. एचएमव्हीला रात्र न् दिवस केवळ ‘येऊ कशी कशी’च्या कॉप्या काढण्याचंच तेवढं काम राहिलं होतं, असं शिंदे यांनी 2007मध्ये झालेल्या भेटीत सांगितलं होतं. (Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

सुरेखा पुणेकरांना चार वेळा वन्समोअर

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी ही लावणी परदेशात सादर केली होती. त्यावेळी त्यांना रसिकांनी ही लावणी चार वेळेस सादर करण्यास सांगितली. परदेशी लोकांना शब्दांचा अर्थ कळत नव्हता. पण रसिकांनी गाणं मात्र डोक्यावर घेतलं होतं. स्वत: पुणेकरांनी शिंदेंना हा किस्सा ऐकवला होता. (साभार, आंबेडकरी कलावंत) (Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

सण वर्षाचा आहे दिवाळी
आज र्‍हावू जाऊ उद्या सकाळी
जेवन करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं ?
उन्हातान्हात चालण्याचं त्रास
दिल्याती चपल्या सांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

तुम्हाला सजना सांगत्ये ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला  (Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

संबंधित बातम्या:

वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से वाचाच!

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(Read how kashi kashi yeu mi nandayla song was made)

Published On - 8:37 pm, Mon, 15 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI