भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी?; मंदी म्हणजे काय रे भाऊ?

रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी आली आहे. दुसऱ्या तिमाहीतही जीडीपी निगेटिव्हच राहणार असल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (indian witnessed recession, know about its impact on economy)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:03 PM, 12 Nov 2020

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी आली आहे. दुसऱ्या तिमाहीतही जीडीपी निगेटिव्हच राहणार असल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. (indian witnessed recession, know about its impact on economy)

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या एका संशोधनानुसार, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी दर उणे 8.6 टक्के होता. म्हणजे जीडीपीमध्ये 8.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. अर्थात हा अधिकृत आकडा नाही. तसेच सरकारी आकडेही जाहीर व्हायचे आहेत. यापूर्वी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये सुमारे 24 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व उद्योग धंदे आणि आर्थिक व्यवहार ठप्प होते. परिणामी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. आता त्यात थोडीफार सुधारणा होत आहे. तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ पॉझिटिव्ह होऊ शकते, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, देशात आर्थिक मंदीने दस्तक दिल्याचं वृत्त येताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारच्या कमकुवत धोरणांचा हा परिणाम असल्याची टीका विरोधक करत आहेत.

मंदी म्हणजे काय?

एखाद्या देशाचा जीडीपी सलग दोन तिमाहीमध्ये निगेटीव्ह राहिल्यास म्हणजे जीडीपीचा दर वाढण्याऐवजी त्यात घसरण झाल्यास मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं अर्थशास्त्राच्या परिभाषेत बोललं जातं. या हिशोबाने जर दुसऱ्या तिमाहीतही भारताचा जीडीपी वास्तवात निगेटिव्ह असेल तर देशात मंदी आलीय असा त्याचा अर्थ आहे.

मंदीमुळे काय नुकसान होतं?

मंदीचा अर्थ म्हणजे देशाचा अर्थचक्र रुतलं असा होतो. मंदीत रोजगार कमी होतात आणि लोकांकडे बचत करण्यासाठी पैसे उरत नाहीत. मंदीमुळे आर्थिक व्यवहारही ठप्प होतात. लोकांचं उत्पन्न, औद्योगिक उत्पादन, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि रोजगार या सर्वांमध्ये मोठी घसरण होते. मंदी दीर्घकाळ सुरू राहिल्यास उद्योग-व्यवसाय आणि बँकांनाही त्याचा मोठा फटका बसतो.

2008मध्ये मंदीतही असा सावरला देश

2008मध्ये जगभरातील अनेक देशात मंदी आली होती. तेव्हाही भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. भारतातील मोठे बाजार, सरकारी खर्च, भारतीय उद्योजकांची गुंतवणूक, जनतेची बचत, गुंतवणूक आदींच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था टिकून राहिली होती. तत्काली पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे स्वत: अर्थतज्ज्ञ असल्याने त्यांनी काळाची पावलं ओळखून अचूक आर्थिक नियोजन केल्याने भारताला मंदीची झळ पोहोचली नव्हती.

 

संबंधित बातम्या:

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ; निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

FM Nirmala Sitharaman : केंद्राकडून मोठं दिवाळी गिफ्ट, ‘प्रोत्साहन’ पॅकेजची घोषणा

(indian witnessed recession, know about its impact on economy)