घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं तुम्ही ठरवा, अमोल कोल्हेंचं हटके आवाहन

लॉकडाऊनची ना शासनाला सवय आहे, ना प्रशासनाला आणि ना नागरिकांना, त्यामुळे सहकार्य करा, असं आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं. (Amol Kolhe on Lock Down)

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं तुम्ही ठरवा, अमोल कोल्हेंचं हटके आवाहन

पुणे : ‘सध्या तुमच्याकडे तीन पर्याय आहेत, निमूटपणे प्रशासनाला सहकार्य करुन घरात राहणे, हिरोगिरी करुन बाहेर हिंडून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये राहणे किंवा भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये’, अशा हटके शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. (Amol Kolhe on Lock Down)

‘स्वयंशिस्तीची, प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. लॉकडाऊनची ना शासनाला सवय आहे, ना प्रशासनाला आणि ना नागरिकांना. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेण्याची, वेळ देण्याची गरज आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून एवढं तरी करु शकतो’, असं अमोल कोल्हे म्हणतात.

‘लॉकडाऊनमुळे शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान होत असल्याचे अनेक फोन कालपासून आले. या संदर्भात “सोशल डिस्टन्सिंग” पाळून, कोरोनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेऊन काय उपाययोजना करता येईल याचा सकारात्मक विचार शासन आणि प्रशासनाने करण्याची आवश्यकता असल्याचं कोल्हे म्हणाले.

‘त्याचवेळी नागरिक म्हणून आपणही आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे, Disaster management म्हणजेच “आपत्ती व्यवस्थापन”. एक महत्त्वाचं तत्व म्हणजे कोणतं नुकसान परवडू शकतं आणि कोणतं परवडू शकत नाही, याचा त्या वेळच्या परिस्थितीनुसार विचार करावा लागतो. उदाहरणार्थ हाताला किंवा पायाला झालेल्या जखमेमुळे गॅगरीनचा धोका निर्माण झाला आणि त्यामुळे जीवाला अपाय होणार असेल, तर हात किंवा पाय कापून अलग करावा लागतो. म्हणजेच हात किंवा पाय गमावण्यामुळे होणारे नुकसान हे जीव गमावण्यापेक्षा त्या परिस्थितीत स्वीकारले जाते’, असं अमोल कोल्हे यांनी सुचवलं.

‘आज कोरोनाचा सामना करताना शासन आणि प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट हे कोरोनाचा प्रसार आणि पर्यायाने मोठ्या प्रमाणावर होऊ शकणारी जीवितहानी रोखणे आणि त्याच वेळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं हे आहे. हिरोगिरी रस्त्यावर बंदी झुगारत फिरण्यात नाही, तर स्वयंशिस्तीने घरी राहण्यात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या 3 पर्याय आहेत-
1) निमूटपणे प्रशासनाला सहकार्य करून घरात राहणे
2) हिरोगिरी करुन बाहेर हिंडून स्वतःला आणि कुटुंबाला धोक्यात घालून हॉस्पिटलमध्ये राहणे
3) भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये

हुशार आणि जबाबदार असू तर नक्कीच पहिला पर्याय निवडू, असा सूचक सल्ला अमोल कोल्हे यांनी दिला.

(Amol Kolhe on Lock Down)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *