कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी करा हे काम, रेबीजचा धोका होतो कमी

Dog Bite : कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी काय करावे जेणेकरुन रेबीजचा धोका टाळता येऊ शकतो. कुत्रा चावल्यानंतर लगेचच काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरुन डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही त्याला प्रतिबंध करु शकतात. ज्यामुळे धोका कमी होतो.

कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी करा हे काम, रेबीजचा धोका होतो कमी
| Updated on: Sep 28, 2023 | 3:29 PM

मुंबई : कुत्रा भुंकला तरी अनेकांचा थरकाप होतो. तर मग कुत्रा चावल्यानंतर लोकांची काय परिस्थिती होत असेल ते विचारायला नको. अनेक जण कुत्र्याला घाबरतात. कारण कुत्रा चावला तर त्याच्या वेदना होतात. ते शरीरासाठी धोकादायक असू शकतो. रस्त्यावरील मोकाट कुत्रे चावले तर इनफेक्शन होण्याचा धोका असतो.  एखादी व्यक्ती रेबीजला बळी पडू शकते. कुत्रा पाळीव असो की भटका. कुत्रा चावला तर तुम्ही बेफिकीर राहू नका. येथे जाणून घ्या कुत्र्याने चावा घेतल्यास प्रथम काय करावे.

कुत्रा चावल्यानंतर सर्वात आधी काय करावे?

कुत्रा चावल्यानंतर व्यक्ती घाबरतो आणि त्याचा बीपी वाढतो. अशा वेळी घाबरुन जावू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम जखमेला कोमट पाण्याने आणि साबणाने काळजीपूर्वक धुवा. रक्तस्त्राव न होता त्वचा तुटलेली असल्यास, कोमट पाणी, साबण आणि स्वच्छ टॉवेलने स्वच्छ करा.

रक्तस्त्राव होत असल्यास स्वच्छ कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करा. रक्तस्त्राव थांबल्यानंतर त्या भागात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ लोशन लावा आणि तुमची जखम मलमपट्टीने झाकून ठेवा. जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना भेटत नाही तोपर्यंत लालसरपणा, सूज, तीव्र वेदना, ताप किंवा पू यांसारख्या संसर्गाच्या लक्षणांकडे लक्ष द्या.

डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

जर तुम्हाला भटक्या कुत्र्याने चावा घेतला असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीज हा कुत्रा चावल्यामुळे होतो, त्यामुळे जर तुम्हाला कुत्रा चावला असेल तर तुम्ही अजिबात बेफिकीर राहू नये आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय रेबीजचा प्रादुर्भाव संक्रमित मांजर, कोल्हे, वटवाघुळ, माकड यांच्या चाव्याव्दारे होऊ शकतो.