डॉक्टरांनी ७ वर्षे टीबीपासून दम्यापर्यंतचे उपचार केले, अखेर १० वर्षांच्या मुलीच्या फुफ्फुसातून पेनाचे टोपण निघाले…
कोणत्याही आजाराचे अचूक निदान होणे खूप गरजेचे असते. अन्यथा डॉक्टर लक्षणे पाहून उपचार करत राहातात. धारावीतील एका दहा वर्षांच्या चिमुकलीवर असेच चुकीचे निदान झाले. त्यामुळे सात वर्षांपासून पालकांना आणि मुलीला नाहक मनस्ताप भोगावा लागला...

एका दहावर्षाच्या मुलीवर आधी टीबी समजून डॉक्टरांनी उपचार सुरु केले. त्यानंतर या मुलीची तब्येत काही केल्या बरी होईना, त्यानंतर या मुलीवर दम्याच्या औषधे सुरु करण्यात आली. गेली सात वर्षे असे चुकीच्या निदानानंतर चुकीचे उपचार झाल्यानंतर अखेर या मुलीचा सीटी स्कॅन केल्यानंतर तिच्या फप्फुसात पेनाचे झाकण अडकल्याने हा त्रास तिला होत असल्याचे कळले. त्यानंतर तिच्यावर शस्रक्रिया होऊन या मुलीला नवे जीवन मिळाले आणि तिच्या पालकांचा मन:स्ताप कमी झाला…
धारावीत राहणाऱ्या या १० वर्षांच्या मुलीला लहानपणापासूनच सतत खोकला येत होता. तसेच तिचे वजन झपाट्याने कमी झाले होते. फुफ्फुसात वारंवार न्युमोनिआ असा त्रास तिला होत होता. सुरुवातीला अनेक डॉक्टरांनी या मुलीला अँटीबायोटिक्स दिली. त्यानंतर तिला एका रुग्णालयाने थुंकीची चाचणी निगेटिव्ह असतानाही ‘प्रिझम्प्टिव्ह टीबी’ची अत्यंत हेव्ही औषधे सुरू केली. टीबीची औषधे देऊनही मुलीच्या प्रकृतीत कोणता फरक पडला नाही. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला ‘दमा’ ( अस्थमा ) असल्याचे निदान करत तिला इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला. परंतु, या सर्व उपचारांचा मुलीला कोणताही फायदा झाला नाही.
पेनाचे टोपण अडकलेले दिसले
या मुलीची प्रकृती काही केल्या सुधारत नसल्याने तिच्या पालकांनी अखेर तिला एका बाल रुग्णालयात दाखवले. तेथे तिच्या शरीराची सखोल तपासणी केली. तिची सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली. सीटी स्कॅनच्या अहवालात मुलीचे एक फुप्फुस आकुंचन पावलेले दिसले. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीची ब्रॉन्कोस्कोपी केली, तेव्हा तिच्या डाव्या फुप्फुसाच्या नळीत अत्यंत खोलवर एक पेनाचे टोपण अडकलेले दिसले. नाक-कान-घसा (ENT) तज्ज्ञ आणि ॲनेस्थेशिया टीमच्या संयुक्त प्रयत्नांनंतर हे झाकण यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आले.
दुर्मिळ घटनांपैकी एक
ही कदाचित अशा दुर्मिळ घटनांपैकी एक आहे. जिथे वस्तूच्या जागेमुळे अचूक निदान करणे खूप कठीण होते आणि रुग्णाच्या लक्षणांनुसार उपचार केले गेले असे या प्रकरणातील एका डॉक्टरांनी म्हटले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल ( नारायणा हेल्थ ) येथील फुफ्फुसरोगतज्ञ डॉ. इंदू खोसला म्हणाल्या की, बहुतेक डॉक्टर बरा न होणारा न्यूमोनिया पाहून डॉक्टर्स तिला क्षयरोगावरील औषधे लिहून देत होते.