
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत त्वचा कोरडी पडण्याची (dry skin) समस्या अधिक वाढते. त्यामुळे खाज सुटण्यासह रॅशेस (rashes) व फोड येणे हा त्रासही होतो. यामुळेच त्वचा मॉयश्चराइज ठेवणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय इन्फेक्शन, ॲलर्जी, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करणे आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यामुळेही खाज (itching) सुटू शकते. त्यामुळे जर तुम्हाला नेहमी खाज सुटण्याचा त्रास होत असेल तर तुमच्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण काही खाद्यपदार्थांमध्ये असलेले घटक खाज वाढवण्याचे काम करतात. खाज येत असल्यास कोणते पदार्थ पूर्णपणे (food to avoid) टाळावेत हे जाणून घेऊया.
अंडं
जास्त खाज येण्याची समस्या असल्यास अंडी खाणे टाळा. त्यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो. कारण अंड्यांमध्ये आढळणारी प्रथिने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे खाज सुटणे, श्वास लागणे, सूज येणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
शेंगदाणे
खाज येत असल्यास शेंगदाणे खाणे पूर्णपणे टाळावे. शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेला सूज येणे आणि जळजळ होणे असा त्रास होऊ शकतो. ॲलर्जी ही मानवी प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. काही लोकांमध्ये, शेंगदाणे हे प्रोटीन अँटीजन म्हणून कार्य करते. या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सुक्या मेव्याची ॲलर्जी असते. जेव्हा एखादी व्यक्ती शेंगदाणे खाते तेव्हा त्यांच्या मास्ट सेल्स (पेशी) ज्यांना बेसोफिल्स असेही म्हटले जाते, त्या एक विशेष प्रकारचे उत्तेजक सोडतात. यामुळे खाज येणे, डायरिया, अस्थमा आणि सूज येणे यासह लाल पुरळ येऊ लागते.
मसालेदार- जंक फूड
खाज सुटणे आणि सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी मसालेदार आणि जंक फूड खाणे टाळावे, कारण ते पचण्यास खूप वेळ लागतो. यामुळे मेटाबॉलिज्म मंदावते आणि विविध समस्या उद्भवतात.
तीळ
खाज सुटत असल्यास तीळ आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणे टाळावे. तिळाचे सेवन केल्याने रॅशेसची समस्याही वाढू शकते.
आंबट पदार्थ
आयुर्वेदानुसार आंबट फळे आणि भाज्या शरीरात पित्तदोष वाढवण्याचे काम करतात. शरीरात पित्त वाढल्याने त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा गोष्टींचे सेवन कमी करावे.
गूळ
आयुर्वेदानुसार, गुळाच्या सेवनानेही त्वचेच्या समस्या असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो, याचे कारण म्हणजे गूळ हा उष्ण प्रकृतीचा असतो, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जे खाज वाढवण्याचे काम करते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)