
हरीश राणा प्रकरणात इच्छामुत्यूला न्यायालयाने मान्यता दिल्यामुळे अशाच जीवन-मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या रुग्णांचा विषय ऐरणीवर आला आहे. ही केस आहे, मुंबईतल्या आनंद दिक्षितची. हरीश सारखाच हा विषय आहे. एक भीषण अपघातानंतर मागच्या दोन वर्षांपासून आनंद कोमाममध्ये आहे. हरीश राणा 2013 साली चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. हरीश कोमामध्ये गेला. तेव्हापासून तो लाइफ सपोर्ट सिस्टिमवर होता. ट्यूबच्या माध्यमातून त्याला अन्न दिलं जात होता. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नाही, म्हणून मग त्याच्या पालकांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करुन हरीशसाठी इच्छा मृत्यूची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केली.
मुंबईमधील 35 वर्षीय आनंद दिक्षित हरीश सारखचं आयुष्य जगत आहे. मागच्या अडीच वर्षांपासून तो कोमामध्ये आहे. आनंद जिवंतपणी मृत्यू यातना भोगत आहे. पण त्याचं कुटुंब हार मानायला तयार नाहीय. 2023 साली हिवाळ्याचे दिवस होते. आनंद गोरखपूरमध्ये होता. 29 डिसेंबर 2023 च्या रात्री आनंद त्याची नवी कोरी स्कूटर चालवत होता. पण त्याचा त्या रात्री अपघात झाला. तो कोमामध्ये गेला. ट्युब मधून त्याला अन्नपाणी चालू झालं. श्वास आज मशिनवर सुरु आहे.
श्वास सुरु ठेवण्यासाठी मोठा आर्थिक संघर्ष
24 वर्षीय केअरटेकर अर्जुन प्रजापती मागच्या 18 महिन्यांपासून आनंद डोळे उघडेल, काहीतरी बोलेल म्हणून त्याच्यासोबत सावलीसारखा आहे. पण आनंद त्या अवस्थेत नाहीय. कोमामध्ये ह्दय, श्वास चालू असतो पण आयुष्य थांबून जातं. मुलाचे श्वास सुरु ठेवण्यासाठी दिक्षित कुटुंबाला प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. मेडीकल बिल 4 कोटीच्या पुढे गेलं आहे. आनंदचे श्वास सुरु ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली सर्व सेव्हींग मोडली.
जेवढं होतं, नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं
मुलाच्या वैद्यकीय लढाईत प्रत्येक पावलावर कुटुंबला लुटलं. हॉस्पिटलचं डोंगराएवढ बिल ते विमा कंपनीकडून नकार, असं आनंदच्या वडिलांनी सांगितलं. त्याच्या तोंडून फक्त पापा हे शब्द ऐकण्यासाठी मी माझ्याकडे जेवढं होतं, नव्हतं तेवढं सगळं विकून टाकलं. या कुटुंबावर आता 50 लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे.