अजिंक्य रहाणे याच्या पत्नीने दादर येथे खरेदी केले दोन लक्झरी फ्लॅट, किंमत किती ?
भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे याची पत्नी राधिका हीने मुंबईतील दादर येथे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.

भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे याची पत्नी राधिका हीने मुंबईतील दादर येथे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. या फ्लॅटची किंमत 24.75 कोटी रुपये आहे. हे फ्लॅट अजून बांधून पूर्ण झालेले नाहीत. राधिका यांना या फ्लॅटचे पझेशन साल २०२८ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही फ्लॅट शिवाजी पार्क भागातील एका इमारतीत आहेत. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशननुसार हा करार २९ ऑक्टोबर २०२६ रोजी नोंद झाला आहे.
राधिका यांनी हे दोन्ही फ्लॅट दादर पश्चिम येथील केळुस्कर रोड साऊथ येथील बांधकाम सुरु असलेल्या ओशियाना इमारतीत खरेदी केले आहेत. या इमारतीचे बांधकाम कोहिनूर प्लॅनेट कंस्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी करत आहे. दोन्ही अपार्टमेंटचा एकूण कार्पेट एरिया 3,391.75 चौरस फूट आहे. या सोबत सहा कारची पार्किंगची सुविधा देखील मिळाली आहे.
एका फ्लॅटचे क्षेत्रफळ 1,913.41 चौरसफूट आहे. ज्याची किंमत 13.97 कोटी रुपये आहे, तर दुसरा फ्लॅटचे क्षेत्रफळ 1,478.34 चौरसफूट आहे याची किंमत 10.79 कोटी रुपये आहे. या संपूर्ण सौद्यासाठी राधिका रहाणे यांनी सुमारे 1.23 कोटी रुपयांची स्टँप ड्युटी भरली आहे. महाराष्ट्र सरकार महिलांनी घर खरेदी केल्यानंतर स्टँप ड्युटीवर एक टक्क्यांची सुट देते. याचा लाभ राधिका यांनाही मिळाला आहे.
इंटेरिअर डिझायनर आहेत राधिका
राधिका रहाणे या पेशाने एक इंटेरिअर डिझायनर आहेत आणि सोशल मीडिया पर्सनालिटी आहेत. अजिंक्य राहाणे यांची राधिका बालपणीची मैत्रिण आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क हा भाग उच्चभ्रू वस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. चांगली कनेक्टिव्हीटी आणि सुविधामुळे येथील प्रॉपर्टीत राधिका राहाणे यांनी गुंतवणूक केली आहे. अजिंक्य राहणे याने शिवाजी पार्क येथे किक्रेट खेळत बालपण घालवले असल्याने त्याला या भागाबद्दल विशेष आपुलकी आहे.
