
गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय शास्त्रात मोठी प्रगती झाली आहे. आता याचेच एक उदाहरण समोर आले आहे. अमेरिकेतील ओहायो येथे 30 वर्षांनंतर जगातील सर्वात वयस्कर बाळाचा जन्म झाला आहे. या बाळाचे नाव थॅडियस डॅनियल पियर्स असे आहे. 1994 मध्ये या बाळाचा गर्भ गोठवण्यात आला होता, त्यातून आता थॅडियसचा जन्म झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
न्यू यॉर्क पोस्टने याबाबत एक वृत्त दिले आहे. यानुसार ओहायो येथील लिंडसे (34) आणि टिम पियर्स (35) हे या बाळाचे पालक आहेत. 26 जुलै 2025 रोजी जन्मलेल्या या बाळाचा गर्भ 30 वर्षांपूर्वी एका आयव्हीएफ सेंटरमध्ये विकसित करण्यात आला होता. या बाळाचे पालक टिम आणि लिंडसे हे बाळाचा गर्भ गोठवण्यात आला होता, तेव्हा 3 किंवा 4 वर्षांचे असतील. तेव्हापासून नोव्हेंबर 2024 पर्यंत हा गर्भ गोठवलेला होता.
थॅडियस हे बाळ आता सर्वाधिक काळानंतर जन्मलेले बाळ आहे. या बाळाची आई लिंडसेने सांगितले की, जेव्हा आम्हाला या गर्भाच्या वयाबद्दल सांगितले होते तेव्हा आम्हाला ते विचित्र वाटले होते. आम्हाला हे माहिती नव्हते की 30 वर्षांपूर्वीही गर्भ गोठवले जायचे. आम्ही विक्रम मोडण्यासाठी बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला नव्हता, आम्हाला फक्त एक मूल हवे होते. कारण आम्ही सात वर्षे गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होतो, मात्र मूल होत नसल्याने आम्हाला थॅडियसचा गर्भ देण्यात आला आहे.
थॅडियस या बाळाची बहीण 30 वर्षांची आहे. तसेच तिला 10 वर्षांची मुलगी आहे. 1994 मध्ये लिंडा आर्चार्ड आणि तिच्या माजी पतीच्या आयव्हीएफ उपचारादरम्यान थॅडियसचा गर्भ इतर तीन गर्भांसह तयार करण्यात आला होता. यातील एक गर्भ लिंडामध्ये प्रत्यारोपित करण्यात आला होता, त्यानंतर तिने नऊ महिन्यांनंतर या मुलीला जन्म दिला होता. ही मुलगी आता 30 वर्षांची आहे. याचाच अर्थ थॅडियसचा गर्भ न गोठवता तो प्रत्यारोपित केला असता तर आज थॅडियसही 30 वर्षांचा असता.