European Union : भारतासोबत ऐतिहासिक करारानंतर EU ची मोठी कारवाई, घेतला अमेरिकेला साथ देणारा मोठा निर्णय

European Union : युरोपियन युनियनने नुकताच भारतासोबत मदर ऑफ ऑल डील्स FTA करार केला. त्यानंतर EU ने आता जगातील एका मोठ्या देशाला दणका दिला आहे. तुम्ही दहशतवाद्यासारखं वागत असाल तर तुमच्याविरोधातही दहशतवाद्यासारखच वागलं पाहिजे असं EU च्या फॉरेन पॉलिसी चीफ काजा कल्लास म्हणाल्या.

European Union : भारतासोबत ऐतिहासिक करारानंतर EU ची मोठी कारवाई, घेतला अमेरिकेला साथ देणारा मोठा निर्णय
EU Action
| Updated on: Jan 30, 2026 | 10:06 AM

युरोपियन युनियनने नुकताच भारतासोबत मुक्त व्यापार करार केला. या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जातय. भारत आणि युरोपियन युनियनमधील या करारावर अमेरिका नाराज आहे. भारतासोबत करार केल्यानंतर EU ने आता मोठी कारवाई केली आहे. त्यांनी इराणला दणका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला (IRGC) दहशतवादी संघटना घोषित केलय. EU च्या फॉरेन पॉलिसी चीफ काजा कल्लास यांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “अलीकडेच IRGC ने आंदोलकांविरोधात क्रूर कारवाई केली. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणूनच युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी निर्णायक ठरणारा निर्णय घेतला आहे”

ब्रसेल्स येथे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला जाताना कल्लास म्हणाल्या की, “आता IRGC अल कायदा, हमास आणि दाएशच्या रांगेत येईल. जर तुम्ही दहशतवाद्यासारखं वागत असाल तर तुमच्याविरोधातही दहशतवाद्यासारखच वागलं पाहिजे” त्याशिवाय EU ने 15 इराणी अधिकाऱ्यांवर प्रतिबंध लावले आहेत. यात इराणचे गृह मंत्री एस्कंदर मोमेनी, प्रॉसिक्यूटर जनरल मोहम्मद मोवाहेदी अजाद आणि जज इमान अफशारी यांचा समावेश आहे.

6000 आंदोलकांचा मृत्यू

इराणमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांविरोधात अत्यंत क्रूर कारवाई करण्यात आली. त्याविरोधात उचलण्यात आलेलं हे पाऊल आहे असं कल्लास म्हणाल्या. या विरोध प्रदर्शनात 6000 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची पृष्टी करण्यात आली आहे. IRGC ला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी EU मध्ये असलेल्या सर्वच्या सर्व 27 सदस्य देशांनी समर्थन केलं आहे.

फ्रान्सची भूमिका बदलली

IRGC चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करणं हा युरोपियन देशांच्या भूमिकेत झालेल्या बदलाचा संकेत आहे. फ्रान्स आणि इटली सारखे देशही या निर्णयाचं समर्थन करत आहेत. यापूर्वी हे देश या निर्णयाचा विरोध करत होते. IRGC ला दहशतवादी संघटना घोषित करायला फ्रान्सने आधी विरोध केला होता. पण आता त्यांनी विरोधावरुन माघार घेतली आहे. इटली आणि स्पेनने सुद्धा IRGC विरोधातील कारवाईच समर्थन केलं आहे.

IRGC काय आहे?

IRGC म्हणजे इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इराणी सैन्याचं हे महत्वाचं अंग आहे. IRGC ची स्थापना 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर झाली होती. शिया धर्मगुरुच्या देखरेखीखाली चालणाऱ्या सरकारचं संरक्षण करणं ही या सुरक्षा गटाची जबाबदारी आहे. त्यानंतर IRGC चा इराणच्या संविधानातही समावेश करण्यात आला. 1980 साली इराकसोबत युद्ध झाल्यानंतर IRGC ची ताकद आणखी वाढली. यात जवळपास 1 लाख 90 हजार सैनिक सक्रीय आहेत. इराणच्या सैन्य बळाचा विचार करता ही संख्या 6 लाखाच्या घरात जाते. IRGC कडे इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल आणि अणवस्त्र कार्यक्रमाची जबाबदारी आहे. सोबतच मिडिल ईस्टमधील इस्रायल विरोधातील प्रॉक्सी दहशतवादी संघटनांना बळ देण्याच काम IRGC कडून होतं.