मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबले? थेट होणार गृह चौकशी, महिला बालकल्याण विभागाने..
Lakki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळाला नाही. ई केवायसी करूनही हप्ता मिळाला नसल्याने महिलांची ओरड आहे. मात्र, आता याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे.

विवेक गावंडे, यवतमाळ : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींनी प्रत्येक महिन्याला सरकारकडून 1500 रूपये मदत देण्यात आली. लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील महिलांनी महायुती सरकारला भरघोष मतदान केले. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी वर्ग केला जात आहे. मात्र, काहीही झाले तरीही आम्ही मार्ग काढू पण कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट सांगितले. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडून काही नियम आणि अटीही लागू करण्यात आल्या. मात्र, त्यावेळी बऱ्याच महिलांनी नियमात बसत नसतानाही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला. त्यांना हप्ता देखील मिळाला. त्यानंतर शासनाकडून अर्जांची छाननी करण्यात आली आणि हजारांच्या घरात महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली.
आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवा असेल तर ई केवायसी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. पण केवायसी करूनही अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे जावे लागेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत असून यवतमाळ जिल्ह्यात केवायसी केल्यानंतरही 58 हजार लाडक्या बहिणीची मदत थांबली आहे. याबाबतचा अहवाल आता राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने यवतमाळ विभागाला पाठवला आहे. या अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे आदेश अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या महिलांनी केवायसी करूनही त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही, त्यांच्या घरी जाऊन चाैकशी केली जाईल.
पुढील 4 दिवसांत याचा अहवाल महिला व बालकल्याण विभागाकडे द्यावा लागणार आहे. अहवाल नंतर 58 हजार लाडक्या बहिणी पात्र की अपात्र, हे ठरणार आहे. नियमात न राहून लाडकी बहीण योजनेचा लाभ जर काही महिला घेत असतील तर त्यांना या गृह चौकशीनंतर अपात्र ठरवले जाणार आहे.
