
सतत भारताविरोधात विखारी वक्तव्य करणाऱ्या शरीफ उस्मान हादीचा गुरुवारी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला. इंकलाब मंचचा संयोजक शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेशात संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी रात्री बांग्लादेशात विरोध प्रदर्शनाचा भडका उडाला. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तेविरोधात आंदोलन उभं करण्यात शरीफ उस्मान हादीने प्रमुख भूमिका बजावली होती. आंदोलकांनी राजशाहीमध्ये अवामी लीगचं कार्यालय पेटवून दिलं. बांग्लादेशात सुरु झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी ढाक्यामध्ये उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.
सिंगापूर येथे हादीचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्यानंतर हजारो लोक शाहबाद चौकात एकत्र जमले. संतप्त जमावाने चौकात ट्रॅफिक जाम केलं. आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हादीची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. पाहता, पाहता प्रदर्शन हिंसक झालं. आंदोलकांनी सर्वप्रथम करवाना बाजारातील प्रथम आलोच्या कार्यालयावर हल्ला केला. आंदोलकांनी अनेक मजल्यांवर तोडफोड केली, फर्नीचर आणि कागदपत्रांना आग लावली. स्थानिक मिडिया रिपोर्ट्नुसार अनेक पत्रकार आणि कर्मचारी इमारतीच्या आत अडकले. त्यानंतर उपद्रवींनी डेली स्टारच्या कार्यलयावर हल्ला केला. तोडफोड करुन जाळपोळ केली.
भारताविरोधात घोषणाबाजी
त्यानंतर आंदोलक गुरुवारी रात्री चटगांव येथे भारतीय उच्चायोग कार्यालयाबाहेर जमा झालेले. तिथे उच्चायोगावर दगडफेक केली. आंदोलकांनी भारत आणि अवामी लीग विरोधात घोषणाबाजी केली.
हादीचा मृत्यू कसा झाला?
12 डिसेंबरला ढाकाच्या बिजॉयगनर भागात निवडणूक प्रचारादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी हादीच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत हादीला ढाक्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नंतर 15 डिसेंबरला एअर एम्बुलेन्सने त्याला सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बांग्लादेश परराष्ट्र मंत्रालय आणि सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी हादीच्या मृत्यूची पृष्टी केली आहे. हादीच्या मृत्यूनंतर बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी राष्ट्राला संबोधित करताना लोकांना शांत राहण्याच आणि कायदा आपल्या हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे.