
इस्रायल आणि इराणमध्ये सुरु झालेलं युद्ध भीषण वळणावर येऊन पोहोचलं आहे. आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर जोरदार मिसाइल हल्ले आणि बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलने इराणची नेतृत्वाची फळी मोडून काढलीय. पण इस्रायलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. इस्रायलमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. आतापर्यंत या युद्धापासून लांब असलेली अमेरिका या युद्धामध्ये उतरु शकते. तेहरान रिकामी करा, अशी सोशल मीडियावर पोस्ट करुन डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. “इराणने मी दिलेला तडजोडीचा फॉर्म्युला स्वीकारायला हवा होता. मानवी जीवनाच नुकसान खूप दु:खद आहे. इराणला अणवस्त्र मिळू नयेत, हे मी स्पष्ट शब्दात सांगेन. मी वारंवार हेच सांगितलय, सगळ्यांनी तात्काळ तेहरान रिकामी केलं पाहिजे” ही डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट आहे.
अमेरिका या युद्धात उतरली, तर इराणमध्ये मोठा विद्धवस होईल. इस्रायलने मूळात दोन उद्दिष्ट समोर ठेऊन हे युद्ध सुरु केलं. यात पहिलं म्हणजे इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखणं आणि इराणमध्ये सत्ता बदल. इस्रायलने इराणच्या अण्विक तळांवर हल्ले केले. पण त्यामुळे इराणची अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता संपल्याच सिद्ध झालेलं नाही. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अण्विक प्रकल्पांच नुकसान झालं. पण त्यांचे युरेनियमचे साठे अबाधित असल्याची शक्यता आहे.
इराणने आधीपासून तयारी करुन ठेवलीय
याच कारण म्हणजे इस्रायल, अमेरिकेकडून आपल्या तळांवर असा हल्ला होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन इराणने फार आधीच डोंगराच्या आत खोलवर बंकर बनवून युरेनियम संवर्धन सुरु केलं होतं. एका रिपोर्टनुसार इराणकडे 60 टक्के शुद्ध युरेनियम आहे. अजून यात 20 ते 30 टक्के वाढ झाली, तर इराण कमीत कमी नऊ अणूबॉम्ब बनवेल असा अमेरिका, इस्रायलचा दावा आहे. म्हणून या युद्धाची सुरुवात झाली. इस्रायलने नतांज अण्विक तळावर हल्ला केला. त्यात नुकसान झालं. पण इराणची अणूबॉम्ब बनवण्याची क्षमता नष्ट झाल्याचे ठोस पुरावे नाहीयत.
इराणचा मुख्य अण्विक तळ कुठल्या शहरात?
कोम शहरात फॉरडू येथे इराणचा अण्विक तळ आहे. एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखा हा तळ आहे. एअर स्ट्राइकमुळे इथे फार नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हा तळ बांधण्यात आला आहे. इस्रायलने 1981 साली इराकच्या ओसीराक अणूभट्टीवर हवाई हल्ला केलेला. तीच गोष्ट ध्यानात घेऊन इराणने भूगर्भात आपले अण्विक प्रकल्प उभारले आहेत.
अमेरिकेला 13,600 किलो वजनाचे असे किती बॉम्ब टाकावे लागतील?
इस्रायलने इराणच्या अण्विक प्रकल्पांवर हल्ले केले असले, तरी ते मूळापासून नष्ट करण्याची इस्रायलकडे क्षमता नाही. त्यासाठी त्यांना अमेरिकेची मदत लागेलच. अमेरिकेकडे GBU-57 हा शक्तीशाली बंकर बस्टर बॉम्ब आहे. 20 फूट लांब असलेल्या या बॉम्बच वजन 13,600 किलो आहे. हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो. इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्या मित्र देशाकडे इतकं शक्तीशाली विमान नाहीय. इराणचा सगळा अणवस्त्र कार्यक्रम संपवण्यासाठी अमेरिका कदाचित तीन ते चार GBU-57 बॉम्बचा वापर करु शकते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. कारण याच बॉम्बने इराणचे भूगर्भात खोलवर असलेले अण्विक तळ उद्धवस्त होऊ शकतात. यापेक्षा कुठल्या कमी क्षमतेच शस्त्र वापरलं, तर इराणला त्यांचा अणू बॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम सुरु ठेवता येईल.