Japan : युद्धाचा ज्वर पेटलेला असताना जपानने अनेक वर्ष जुना एक नियम बदलला त्यामुळे चीनचे अक्षरश: धाबे दणाणले

Japan : जपान एक शांती प्रिय देश आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने जाणीवपूर्वक अशी प्रतिमा तयार केली आहे. नुकताच जपानने एक निर्णय घेतला आहे. अनेक वर्ष जुना नियम त्यांनी बदलला आहे. त्यामुळे चीन टेन्शनमध्ये आला आहे.

Japan : युद्धाचा ज्वर पेटलेला असताना जपानने अनेक वर्ष जुना एक नियम बदलला त्यामुळे चीनचे अक्षरश: धाबे दणाणले
Sanae takaichi-Jinping
Image Credit source: PTI/AP
| Updated on: Apr 22, 2026 | 3:45 PM

चीन आणि उत्तर कोरियाकडून वाढता धोका लक्षात घेऊन जपानने शस्त्रांसंबंधीच्या आपल्या अनेक दशकापूर्वीच्या जुन्या नियमात मोठा बदल केला आहे. पंतप्रधान सनाय ताकाइची सरकारने दुसऱ्या देशांना विकल्या जाणाऱ्या शस्त्रांमध्ये घातक अस्त्रांचा समावेश केला आहे. जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर शांतता प्रिय देश म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जपानने घातक शस्त्रांची विक्री बंद केली होती. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट आणि नॅशनल सिक्योरिटी काऊन्सिलच्या बैठकीत हा नियम बदलण्यात आला. या नियमात बदल करण्याआधी दुसऱ्या देशांना संरक्षण साहित्य विकण्यावर कठोर प्रतिबंध होते.आधी मदत, टेहळणी आणि ट्रान्सपोर्ट संबंधित संरक्षण उपकरणं दुसऱ्या देशांना विकली जायची. आता त्या मर्यादा हटवल्या आहेत. जपान आता दुसऱ्या देशांना युद्धनौका आणि मिसाइल सारखी घातक अस्त्र सुद्धा विकू शकतो.

जपानच्या या निर्णयाला त्यांचा कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी चीनने विरोध केला आहे. फिलीपींस आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयानंतर जपानने स्पष्ट केलय की, दुसऱ्या महायुद्धानंतर शांतताप्रिय देशाचा आमचा जो मूळ सिद्धांत होता, त्यावर आम्ही आजही कायम आहोत.

हा व्यवहार इतका सोपा नसेल

आजच्या काळात कुठलाही देश आपली सुरक्षा स्वबळावर करु शकत नाही असं जपानचं म्हणणं आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी मित्र राष्ट्रांची ताकद वाढवणं आणि संरक्षण सहकार्य पुढे नेणं गरजेचं आहे. जपानने घातक शस्त्रास्त्र विकण्याचा हा जो निर्णय घेतला आहे, त्यामुळे दुसऱ्या देशांना युद्धनौका, कॉम्बॅट ड्रोन्स आणि अन्य शस्त्रास्त्र विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण हा व्यवहार इतका सोपा नसेल. कुठलाही विक्री करार फायनल करण्याआधी नॅशनल सिक्यूरिटी काऊन्सिल सर्व अंगांनी चौकशी करेल.

यावर जपानचं लक्ष असेल

जपानचा ज्या देशांसोबत करार आहे, त्यांनाच ते ही घातक शस्त्रास्त्र विकतील. युद्धात सहभागी असलेल्या देशांना ही शस्त्रास्त्र दिली जाणार नाहीत. खास परिस्थितीतच ही शस्त्र दिली जातील. जपान ज्या देशांना ही शस्त्रास्त्र विकेल, त्यांना ती तिसऱ्या देशाला देता येणार नाहीत. जपान शस्त्र विकल्यानंतर त्याचा वापर कसा होतोय, यावर त्यांचं लक्ष असेल.

या निर्णयाचं फिलीपींसने स्वागत केलं

जपानच्या या निर्णयाचं फिलीपींसने स्वागत केलय. जपान लवकरच आपली जुनी युद्धनौका फिलिपींसला विकू शकतो. आमची सुरक्षा अजून मजबूत होईल व क्षेत्रात संतुलन टिकून राहिल असं फिलीपींसने म्हटलं आहे. चीनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जपानही आपली सैन्य ताकद वाढवत आहे. जपानकडे मिसाइल, स्टेल्थ फायटर विमान आणि ड्रोन्स आहेत. त्याशिवाय ब्रिटन आणि इटली सोबत मिळून जपान सहाव्या पिढीचं फायटर जेट विकसित करत आहे.

Follow Us