Axiom 4 Mission Launch : शुभांशु शुक्ला यांनी रचला इतिहास, मिशन Axiom-4 साठी अंतराळात रवाना; मोदींकडून शुभेच्छा

Axiom 4 Mission Launch : एक्सिओम-4 मिशनच्या लॉन्चिंगला वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब झाला. एक्सिओम-4 हे स्पेसएक्सचे 53 वे ड्रॅगन मिशन आहे आणि 15 वी मानवी अंतराळ मोहिम आहे.

Axiom 4 Mission Launch : शुभांशु शुक्ला यांनी रचला इतिहास, मिशन Axiom-4 साठी अंतराळात रवाना; मोदींकडून शुभेच्छा
shubhanshu shukla
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 1:43 PM

बऱ्याच प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुंभाशु शुक्ला आणि तीन अन्य अंतराळवीर आज एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाले. ते आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर जाणार आहेत. दुपारी 12.01 मिनिटांनी मिशन लॉन्च झालं. बुधवारच्या संभाव्य उड्डाणासाठी हवामान 90 टक्के अनुकूल आहे, स्पेसएक्सने जाहीर केलं होतं. “एक्सिओम_स्पेस Ax-4 mission च्या स्पेस स्टेशनवर प्रक्षेपणासाठी सर्व सिस्टिम चांगल्या दिसत आहेत. उड्डाणासाठी 90 टक्के हवामान अनुकूल आहे” असं स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलं होतं. स्पेसएक्सकडे या मिशनसाठी ट्रान्सपोर्टची जबाबदारी होती.

बऱ्याचवेळा मोहिम पुढे ढकलली

एक्सिओम-4 हे स्पेसएक्सचे 53 वे ड्रॅगन मिशन आहे आणि 15 वी मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हेही अंतराळात जाणार आहेत. ही मोहीम आधी 8 जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती 10 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर 25 जूनला शुंभाशु शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केलं.


कोण आहेत शुभांशू शुक्ला ?

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.

मोदींकडून शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुक्लाला शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन गेलेल्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत करतो. भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या सोबत 1.4 अब्ज भारतीयांचे शुभेच्छा, आशा आणि आकांक्षा आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशाच्या हार्दिक शुभेच्छा!, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.