
Khaleda Zia Political Journy : बांग्लादेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय आज कायमसाठी बंद झाला. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) प्रमुख आणि देशाच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया (Khaleda Zia) यांचं मंगळवारी 30 डिसेंबरला निधन झालं. दीर्घ आजारपण आणि वाढत्या वयामुळे होणारे त्रास याचा सामना करणाऱ्या खालिदा जिया यांनी ढाक्यामध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ बांग्लादेशच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियातून शोक संदेश येत आहेत. खालिदा जिया या फक्त एक राजकीय नेता नाहीत. त्या बांग्लादेशाच्या इतिहासाच्या एक साक्षीदार आहेत. जेव्हा त्यांचा देश सैन्य शासनातून बाहेर येऊ लोकशाहीच्या दिशेने चाललेला. लाजरी गृहिणी ते बांग्लादेशची आर्यन लेडी बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप चढ-उतारांनी भरलेला, संघर्षपूर्ण आहे. शेख हसीना यांच्यासोबतची त्यांची दुश्मनी, त्यांचा राजकीय प्रवास आणि या सगळ्यामध्ये त्याच्या आयुष्याच्या माहित नसलेल्या काही गोष्टी, किस्से जाणून घेऊया.
15 ऑगस्ट 1945 रोजी दिनाजपूर येथे खालिदा जिया यांचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप सामान्य होतं. 1960 साली त्यांचं लग्न पाकिस्तानी सैन्यातील कॅप्टन (नंतर ते बांग्लादेशचे राष्ट्रपती बनले) जियाउर रहमान यांच्यासोबत झालं. त्यावेळी खालिदा यांची प्रतिमा एका गृहिणीची होती. त्यांना राजकारणात काही इंटरेस्ट नव्हता. असं म्हणतात, जेव्हा त्यांचे पती बांग्लादेशचे राष्ट्रपती होते, तेव्हा सुद्धा खालिदा सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसायच्या. मुलांच्या संगोपनात त्या व्यस्त होत्या.
आयुष्य कायमचं बदलून टाकलं
30 मे 1981 रोजी एका अयशस्वी सैन्य सत्तापालटाच्या प्रयत्नात त्यांचे पती आणि तत्कालीन राष्ट्रपती जियाउर रहमान यांची हत्या झाली. या घटनेने खालिदा जिया यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. पतीच्या मृत्यूनंतर बीएनपी पार्टी विखुरण्याच्या स्थितीत होती. अशावेळी आपल्या नवऱ्याचा वारसा आणि पक्ष वाचवण्यासाठी खालिदा यांना घराची वेस ओलांडून राजकीय अखाड्यात उतरावं लागलं. 1984 साली त्यांनी बीएनपीची सूत्र स्वीकारली.
‘आपोसहीन नेत्री’ त्यांना का म्हणायचे?
खालिदा जिया यांची राजकीय परीक्षा 1980 च्या दशकात सुरु झाली. त्यावेळी त्यांनी सैन्य हुकूमशाह एच.एम. इरशाद यांच्याविरोधात एक दीर्घ आणि कठोर आंदोलन चालवलं. त्यांना अनेकदा नजरकैदेत ठेवण्यात आलं. पण त्या डगमगल्या नाहीत, झुकल्या नाहीत. याची जिद्दीमुळे समर्थकांनी त्यांना ‘आपोसहीन नेत्री’ ची (Uncompromising Leader) उपाधी दिली.
पहिल्या महिला पंतप्रधान
1991 साली बांग्लादेशात निष्पक्ष निवडणूक झाली. त्यावेळी खालिदा जिया यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीगला हरवून इतिहास रचला. त्या बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. मुस्लिम विश्वात (बेनजीर भुट्टो यांच्यानंतर) कुठल्याही लोकशाही सरकारचं नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या महिला बनल्या.
आधी एकत्र लढल्या, मग दोघी एकमेकींच्या कट्टर दुश्मन
खालिदा जिया यांची कथा कट्टर प्रतिस्पर्धी शेख हसीना यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहिलं. जवळपास तीन दशकं बांग्लादेशच राजकारण या दोन महिला‘बेगम्स’च्या आसपास फिरत राहीलं. कधीकाळी देशात लोकशाही आणण्यासाठी एकत्र लढणाऱ्या या दोघी पुढे जाऊन परस्परांच्या कट्टर दुश्मन बनल्या. त्यांच्या शत्रुत्वाने बांग्लादेशची दोन गटात विभागणी केली. खालिदा जिया यांचा कल दक्षिणपंथी आणि इस्लामिक गटांसोबत आघाडी करण्याकडे होता. दुसरीकडे हसीना स्वत:ला धर्मनिरपेक्षतेच्या ध्वजवाहक मानायच्या.
आयुष्यातील अखेरचा काळ खूप त्रासदायक
खालिदा जिया यांच्या आयुष्यातील अखेरचा काळ खूप त्रासदायक होता. 2018 साली त्यांना ‘जिया ऑर्फनेज ट्रस्ट’ प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. त्यांना 17 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांचे समर्थक आणि पक्षाचं म्हणणं होतं की, हे आरोप राजकारणाने प्रेरित आहेत. जेणेकरुन त्यांना निवडणुकीपासून लांब ठेवता येईल. मागची अनेक वर्ष त्या गंभीर आजार (लिवर सिरोसिस, मधुमेह) याने त्रस्त होत्या. अनेकदा त्या उपचारासाठी रुग्णालयात असायच्या.
मृत्यूच्या एकदिवस आधीच भरलेला उमेदवारी अर्ज
मृत्यूच्या एकदिवस आधीच खालिदा यांनी संसदीय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी 3 ठिकाणाहून अर्ज भरलेला. बांग्लादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा मुलगा आणि BNP चे सक्रीय चेअरमन तारिक रहमान यांनी दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज भरला आहे.
किती आजार झालेले?
डॉक्टरांनुसार, खालिदा जिया यांना लीवर सिरोसिस, डायबीटीज आणि हार्टशी संबंधित आजार होते. माजी पंतप्रधान दीर्घकाळापासून आजारांचा सामना करत होत्या.डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीवर लक्ष होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. द डेली स्टार नुसार, 23 नोव्हेंबरला त्यांना हॉर्ट आणि फुप्फुसांमध्ये संक्रमण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या 36 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना निमोनियाचा सुद्धा आजार झालेला.
बांग्लादेशात संसदीय निवडणूक कधी?
बेगम खालिदा ज़िया आणि पार्टीचे एक्टिंग चेअरमन तारिक रहमान यांनी देशात होणाऱ्या 13 व्या नॅशनल पार्लियामेंट्री निवडणुकीसाठी एकूण 5 संसदीय जागांवरुन उमेदवारी अर्ज भरला आहे. सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 12 फेब्रुवारीला बांग्लादेशात संसदीय निवडणुका आहे.