
बांग्लादेशात कट्टरपंथीय आपली पाळं-मुळं घट्ट करत चालले आहेत. तिथे फक्त हिंदू विरोध नाही, तर सांस्कृतिक दहशतवाद सुद्धा वाढत चालला आहे. त्याचं एक उदहारण समोर आलय. बांग्लादेशातील प्रसिद्ध रॉकस्टार आणि बँड आयकॉन जेम्स याच्या कॉन्सर्टला वाढत्या कट्टरतावादाचा फटका बसला आहे. गदारोळामुळे जेम्सची कॉन्सर्ट होऊ शकली नाही. फरीदपूर येथे शुक्रवारी रात्री जेम्सची कॉन्सर्ट होणार होती. पण काही बाहेरच्या लोकांनी कार्यक्रम स्थळी येऊन गोंधळ घातला. फरीदपूर जिल्हा स्कूलला 185 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास फरीदपूर जिल्हा स्कूल परिसरात हा कार्यक्रम होणार होता.
आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्सर्ट सुरु होण्याच्या काहीवेळ आधी काही बाहेरचे लोक जबरदस्त आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा स्टेज ताब्यात घेण्यासाठी विटा, दगडफेक त्यांनी सुरु केली. स्थानिक लोकांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांचा विरोध केला. पण अखेरीस स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संगीत कार्यक्रम रद्द करावा लागला.
20 ते 25 विद्यार्थी जखमी
हल्लेखोरांच्या या कृतीमुळे कार्यक्रम स्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जिल्हा शाळेच्या विद्यार्थ्यांनी हल्लेखोरांना मागे हटायला भाग पाडलं. यावेळी झालेल्या दगडफेकीत 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले असं मिडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फरीदपुरच्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरुन सुरक्षा कारणांमुळे कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, आयोजन समितीचे संयोजक मुस्तफिज़ुर रहमान यांनी ही माहिती दिली. परिस्थिती लक्षात घेता कार्यक्रम सुरु ठेवणं शक्य नव्हतं. “जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला का केला? यामागे कोण लोक आहेत? या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाले. हे गंभीर आहे” असं राजिबुल हसन खान म्हणाले
कोण आहे जेम्स?
जेम्स हा बांग्लादेशी गायक-गीतकार, गिटारवादक आणि संगीतकार आहे. त्यांना पार्श्वगायक म्हणूनही ओळखलं जातं. ते रॉक बँड ‘नगर बाउल’ चे मुख्य गायक, गीतकार आणि गिटारवादक आहेत. त्याने अनेक हिट हिंदी चित्रपटात गाणी गायली आहेत. फिल्म ‘गँगस्टर’ मधील ‘भीगी भीगी’, फिल्म ‘लाइफ इन ए मेट्रो’ मधील ‘अलविदा’ ही गाणी गायली आहेत. बांग्लादेशातील तो लोकप्रिय गायक आहे