
चीनने तैवानला चारही बाजूंनी घेरुन आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धभ्यास सुरु केला आहे. सोमवारपासून सुरु झालेल्या या युद्धभ्यासाला जस्टिस मिशन 2025 नाव देण्यात आलं आहे. तैवानचा बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून चारही बाजूंनी आम्ही त्यांना कसं घेरू शकतो हे दाखवणं चीनचा या युद्धसरावामागे उद्देश आहे. चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडनुसार, या युद्धाभ्यासात पायदळ, नौदल आणि एअरफोर्स तिघे सहभागी आहेत. चीनने मोठ्या संख्येने सैनिक, लढाऊ जहाजं, तोफा आणि मिसाइल सिस्टिम तैनात केली आहे. युद्धभ्यासात जमीन आणि समुद्रात बनवण्यात आलेल्या टार्गेट्सवर लाइव्ह फायरिंगचा सराव केला जात आहे. तैवानच्या मुख्य बंदराला बंद करण्याच्या रणनितीचा अभ्यास केला जात आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, सोमवारी बेटाजवळ 89 चिनी विमानं, 14 जहाजं आणि 14 तटरक्षक दलाच्या बोटी फिरत होत्या. पश्चिमी प्रशांत महासागरात चार वॉरशिप दिसून आल्या.
चीनच्या मेरीटाइम सेफ्टी एडमिनिस्ट्रेशनने तैवानच्या आसपासच्या 7 समुद्री क्षेत्रांना अभ्यास क्षेत्र घोषित केलं आहे. या भागात मंगळवारपर्यंत लाइव्ह फायरिंग चालणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास मानला जात आहे. कारण आधीच्या युद्ध सरावाच्या तुलनेत या अभ्यासाचं क्षेत्र मोठंआहे. युद्ध सरावाचं क्षेत्र तैवानच्या जवळ आहे. आधी सांगण्यात आलेलं की, फायरिंगमध्ये फक्त 5 क्षेत्र असतील. पण नंतर वाढवून 7 करण्यात आली. सैन्य अभ्यासाचा सर्वसामान्य लोकांवर सुद्धा परिणाम होत आहे. चीनच्या परिवहन मंत्रालयानुसार, मंगळवारी होणाऱ्या युद्धसरावामुळे 1 लाखापेक्षा अधिक प्रवाशांची आंतरराष्ट्रीय उड्डाणं प्रभावित होणार आहेत. त्याशिवाय 80 देशांतर्गत उड्डाणं रद्द करावी लागली आहेत.
भविष्याची टेक्नोलॉजी दाखवली
अमेरिकेने तैवानला 11.1 अब्ज डॉलरच शस्त्रास्त्र पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर 11 दिवसात हे सर्व सुरु झालय. चीनने याला बाहेरील हस्तक्षेप ठरवलं असून ही रेड लाइन पार करणं असल्याचं म्हटलं आहे. एक्सपर्ट्सनुसार चीन या युद्ध सरावाच्या माध्यमातून अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांना कठोर संदेश देत आहे. चीनने यावेळच्या अभ्यासात नवीन आणि भविष्याची टेक्नोलॉजी दाखवली आहे.
सीमावर्ती भागापर्यंत ही रॉकेट्स मारा करु शकतात
यात ह्यूमनॉइड रोबोट, मायक्रो ड्रोन आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज रोबोटिक कुत्रे सुद्धा यामध्ये आहेत. तैवानने या युद्धभ्यासाचा कठोर शब्दात निषेध केला आहे. तैवानचं सैन्य हाय अलर्ट वर आहे. तैवानने सुद्धा आपली शस्त्र दाखवली आहेत. यात अमेरिकेने दिलेली HIMARS रॉकेट सिस्टिम सुद्धा आहे. चीनच्या सीमावर्ती भागापर्यंत ही रॉकेट्स मारा करु शकतात.