Solar Eclipse 2026 : पृथ्वीवर दिवसा पडणार अंधार, ऑगस्ट महिन्यात या दिवशी लागणार सूर्यग्रहण; भारतात दिसणार का?
सूर्यग्रहण केवळ खगोलप्रेमींसाठी आकर्षण नसून वैज्ञानिक अभ्यासासाठीही महत्त्वाचे असते. या घटनेदरम्यान पृथ्वीच्या वातावरणात होणारे बदल समजून घेण्यासाठी वैज्ञानिक विविध उपकरणे निरीक्षण करणार आहेत. त्यामुळे हे सूर्यग्रहण अवकाश संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Solar Eclipse August 2026 : मानवाला सूर्य आणि चंद्रग्रहणाचे एक वेगळे आकर्षण आहे. भारतात तर या ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. ग्रहण लागल्यावर काही गोष्टी केल्यावर त्याचा वाईट परिणाम होतो, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात कोणतेही सत्य नाही. दरम्यान, यंदा 12 ऑगस्ट रोजी 2026 मधील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. जागातील अनेक भागात हे सूर्यग्रहण दिसेल. या दिवशी सूर्याचा काही हिस्सा चंद्राच्या सावलीमुळे झाकलेला असेल. त्यामुळे हे सूर्यग्रहण नेमके कुठे दिसेल? ते जाणून घेऊ या…
सूर्यग्रहणाच्या वेळी काही काळ…
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यावर सूर्यग्रहण होते. या स्थितीत चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्यप्रकाशाचा काही भाग किंवा संपूर्ण प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी काही काळ दिवस असूनही अंधाराचे वातावरण निर्माण होते.
2 मिनिटे 18 सेकंद दिसणार अनोखे दृश्य
12 ऑगस्टच्या पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान चंद्र काही काळासाठी सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे. जास्तीत जास्त काळासाठी हे पूर्ण ग्रहण सुमारे 2 मिनिटे 18 सेकंद राहण्याची शक्यता आहे. या काळात दिवसाच्या वेळी संध्याकाळसारखा अंधार जाणवू शकतो. आकाश निरभ्र असल्यास काही तेजस्वी तारे आणि ग्रहही दिसण्याची शक्यता आहे.
कुठे दिसणार सूर्यग्रहण?
पूर्ण सूर्यग्रहणाचा ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेनच्या या देशात दिसेल. या पट्ट्याबाहेर युरोपातील अनेक भागांत आंशिक सूर्यग्रहण पाहता येईल. उत्तर अमेरिकेतील काही भागांमध्येही सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. अलास्कापासून अमेरिकेच्या उत्तर भागातील काही प्रदेशांपर्यंत हे दृश्य पाहण्याची संधी मिळेल.
वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची घटना
मात्र भारतीयांसाठी यावेळी निराशाजनक बातमी आहे. 12 ऑगस्टचे हे सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार नाही, कारण ग्रहणाचा मार्ग भारतापासून दूर आहे. दरम्यान, सूर्यग्रहण केवळ खगोलप्रेमींसाठी आकर्षण नसून वैज्ञानिक अभ्यासासाठीही महत्त्वाचे असते. या घटनेदरम्यान पृथ्वीच्या वातावरणात होणारे बदल समजून घेण्यासाठी वैज्ञानिक विविध उपकरणे निरीक्षण करणार आहेत. त्यामुळे हे सूर्यग्रहण अवकाश संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.