
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमास यांच्या युद्धाबाबत मोठी घोषणा केली. सोमवारी त्यांनी शर्म अल-शेख येथे गाझा शांतता शिखर परिषदेला हजेरी लावली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण होते. मात्र, मोदी न जाता त्यांनी त्यांचे दूत पाठवले. नरेंद्र मोदी हे परिषदेला गैरहजर असूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत काैतुक केले. भारत आणि अमेरिकेच्या नात्यावर बोलतानाही ट्रम्प दिसले. आता याच दरम्यानचा एक हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे कौतुक केले. फक्त काैतुकच नाही तर त्यांच्या दिसण्यावरही मोठी टिप्पणी केली.
शर्म अल-शेख येथील गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले की, आमच्याकडे एक महिला आहे, एक सुंदर तरूणी… मला हे बोलण्याची तशी परवानगी नाहीये. कारण तुम्ही हे बोलले तर तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले की, स्टेजवर उभ्या असलेल्या इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्याबद्दलच्या त्यांच्या टिप्पणीमुळे लिंगभेदाचे आरोप होऊ शकतो.
मेलोनी यांना उद्देशून डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तुम्हाला सुंदर म्हटले तर काही हरकत नाही ना? कारण तुम्ही सुंदर आहात… डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून मेलोनी या हसताना दिसल्या. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मंचावरून मेलोनी यांच्या सुंदरतेचे जोरदार काैतुक केले आहे.
यावेळी परिषदेमध्ये उपस्थित अनेक देशांचे पंतप्रधान देखील उपस्थित होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे मेलोनी यांचे काैतुक केले, त्यानंतर अनेक लोकांनी भूवया उंचावल्याचे बघायला मिळाले. यावेळी शरीफ यांची फिरकी घेताना देखील डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारत-पाकिस्तान संबंधांवर मोठा प्रश्न शरीफ यांना विचारला. ज्याला त्यांनी थेट होकार दिला.