गुडनाईट… चल बेडवर… ट्रम्प यांची जीभ घसरली, थेट मुस्लिम महिला खासदाराला…
फ्लोरिडा येथील एका सभेत ट्रम्प यांनी काँग्रेस सदस्या इल्हान ओमर यांच्यावर एक तीव्र आणि वादग्रस्त हल्ला चढवला. मंचावरून ओमर यांची नक्कल करत, ट्रम्प यांनी त्यांच्यावर स्वतःच्या भावाशी लग्न केल्याचा आरोप केला आणि हे 'तिरस्करणीय' असल्याचं म्हटलं. ट्रम्प यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.

विविध वक्तव्य, जगाला हादरवणाऱ्या घोषणा करून धडकी भरवणारे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी, फ्लोरिडामधील एका रॅलीदरम्यान त्यांनी अमेरिकन मुस्लिम काँग्रेसवुमन इल्हान ओमर यांच्या बोलण्याच्या टोनची नक्कल केली. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यापुढे त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यामुले एक नवीन वाद निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इल्हान ओमर यांच्यावर गंभीर आरोप केलेत, ओमर यांनी आपल्या भावाशी लग्न केल्याचा खळबळजनकआरोप ट्रम्प यांनी केलाय. बोलता बोलता ट्रम्प यांची जीभ चांगलीच घसरली.
तिने आपल्याच भावाशी लग्न केलं.. ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
आपल्या भाषणादरम्यान, ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांचा उल्लेख केला, तेव्हा त्यांच्या नागरिकत्वावर तसेच त्या अमेरिकेत कशा आल्या यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी मंचावरून ट्रम्प यांनी एक जुनी आणि विवादीत अफवा पुन्हा पसरवली. ” मला वाटतं की तिने तिच्या भावाशी लग्न केलं आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. खरं तर, ते एक चांगलं जोडपं आहेत, पण हे थोडे बेकायदेशीर आहे” असं ते म्हणाले.
स्टेजवरून मिमिक्री आणि उडवली खिल्ली
ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मंचावरून त्या कथित संबंधांची खिल्ली उडवली, इतकेच नव्हे तर एका काल्पनिक संभाषणाची नक्कलही केली. ट्रम्प उपहासाने म्हणाले : “डार्लिंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुडनाइट भावा. चला झोपूया.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे गर्दीत खळबळ उडाली. “ती किळसवाणी आहे ना? मी तिच्याकडे पाहूही शकत नाही.” असं ट्रम्प तिरस्कार व्यक्त करत म्हणाले.
काय आहे कहाणी ?
ट्रम्प यांची टिप्पणी एका दीर्घकाळ चाललेल्या वादातून उद्भवली आहे. पुराणमतवादी बऱ्याच काळापासून असा दावा करत आहेत की इल्हान ओमर यांनी स्वतःच्याच भावाशी लग्न केले होते. पण या सभेत ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्या उच्चारांची नक्कल केली, विशेषतः ‘भाऊ’ या शब्दाचा वापर केला, त्यांचा याच दाव्याकडे निर्देश होता.
सोमालियाच्या नावाखाली इल्हान ओमर यांच्यावर हल्ला
त्यानंतर ट्रम्प यांनी काँग्रेस सदस्या इल्हान ओमर आणि त्यांच्या मूळ देश सोमालियावर टीका केली. “एक सुंदर ठिकाण” अशी उपहासात्मक टिप्पणी करत त्यांनी सोमालियाचे वर्णन केलं. तिथे सरकार किंवा सैन्य नाही; फक्त गरिबी, प्रदूषण आणि गुन्हेगारी आहे असंही पुढे ते म्हणाले.
ओमर जगातील सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या देशातून आल्या आहेत आणि त्या येथील लोकांना देश कसा चालवायचा हे शिकवण्यासाठी अमेरिकेत आल्या आहेत, असं म्हणत त्यांनी इल्हान ओमर यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला. एवढंच नव्हे तर ट्रम्प यांनी ओमर यांना ढोंगी म्हटले आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या मागणीवर नाराजी व्यक्त करत त्यांना देशाबाहेर काढण्याची मागणी केली.