
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि आणि अमेरिका सतत इराणवर हल्ले करत आहे. अशातच आता या युद्धात इराणला मोठा धक्का बसला आहे. 17 वर्षांपासून खांद्याला खांदा लावून चालणारे इराण आणि हमास यांच्यात आता ‘कोल्ड वॉर’सारखी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. युद्धादरम्यान शेजारी देशांविरुद्ध इराणने अवलंबलेली आक्रमक रणनीती पाहून हमासही आश्चर्यचकित झाला आहे. हमासने जगासमोरच इराणला आपली पद्धत बदलण्याचा सल्ला दिला आहे. गुप्तचर सूत्रांच्या मते, एक्सिस ऑफ रेजिस्टन्स या गटात अशी फूट प्रथमच दिसून येत आहे. हमासच्या बदललेल्या भूमिकेमागे काय कारणे आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.
गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हमासने इराणला सऊदी अरेबिया, यूएई आणि कतारसारख्या खाडी देशांवर हल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की हमासने इराणच्या या निर्णयाला विरोध का केला? यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पैसा आणि कूटनीतिक समर्थन. हमासला माहित आहे की जर खाडी देशांवर हल्ले झाले, तर त्याची आर्थिक आणि राजनैतिक स्थिती गंभीरपणे कमजोर होऊ शकते. त्यामुळे हमासने इराणच्या भूमिकेला विरोध केला आहे.
गुप्तचर अहवालांनुसार, हमासची आर्थिक व्यवस्था यूएईशी संबंधित नेटवर्क आणि आर्थिक मार्गांवर अवलंबून आहे. जर इराणची क्षेपणास्त्रे दुबई किंवा आसपासच्या भागात पडली, तर गाझापर्यंत पोहोचणारा हा आर्थिक मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे हमासने इराणला विरोध केला आहे. तसेच कतार हमासच्या राजकीय नेतृत्वाला आश्रय देतो आणि युद्धविराम चर्चांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हमासने कतारवर हल्ले थांबवण्यास सांगितले आहे.
सऊदी अरेबिया हा संपूर्ण अरब जगाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. जर इराणचे ड्रोन किंवा क्षेपणास्त्रे सऊदी अरेबियाच्या भूमीवर पडली, तर अरब देशांमध्ये हमासविरोधात संताप निर्माण होऊ शकतो. यामुळे इराणची आक्रमक लष्करी रणनीती हमासची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करू शकते. याचा फटका संघटनेला बसू शकतो.
गेल्या अनेक वर्षांपासून इराण हमासला आर्थिक मदत, शस्त्रे आणि प्रशिक्षण देत आहे. मात्र आता हमासने पहिल्यांदाच इराणच्या युद्धनीतीला विरोध दर्शवला आहे. आता हमास इराणच्या प्रादेशिक संघर्षांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इराणच्या युद्धात अडकून त्यांचे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते यामुळे कदाचिक हमासने इराणला विरोध केल्याचे बोलले जात आहे.