भारत अमेरिकेला देणार मोठा दणका? डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ पडणार महागात, नवा प्लॅन काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅरिफची घोषणी केली, मात्र आता हा निर्णय ट्रम्प यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

भारत अमेरिकेला देणार मोठा दणका? डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ पडणार महागात, नवा प्लॅन काय?
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Aug 10, 2025 | 4:43 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅरिफची घोषणी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता भारत देखील या दिशेनं मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. एचटीच्या एका वृत्तानुसार भारत काही निवडक अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक शुल्क (Retaliatory Tariffs) लादण्याची तयारी करत आहे. अमेरिकेनं भारतीय स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क वाढवले आहे, त्यामुळे भारत आता प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिकेनं जून 2025 मध्ये भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात शुल्क 25 टक्क्यांवरून वाढून 50 टक्के इतकं केलं होतं. त्यानंतर 31 जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली, सर्व प्रकारच्या भारतीय सामानावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यासाठी पेनल्टी म्हणून अमेरिकेकडून आणखी 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला, त्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के इतका टॅरिफ लावण्यात आला आहे.

हा सर्व विषय फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झाला, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांचा हवाला देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय स्टील आणि एल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO च्या नियमानुसार हे चुकीचं असल्याचं भारतानं अमेरिकेला म्हटलं होतं, तसेच भारतानं अमेरिकेला नोटीस देखील दिली होती, त्यामध्ये असं म्हटलं होतं की, जर तुम्ही शुल्क हटवलं नाही तर तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल. मात्र नोटीस दिल्यानंतर देखील अमेरिकेनं या विषयावर भारतासोबत कोणतीच चर्चा केली नाही.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक भरताच्या सर्व सामानावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली, त्यानंतर अमेरिकेनं हा टॅरिफ वाढून 50 टक्के केला आहे, आता अमेरिकेच्या या निर्णयाला भारत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.