
जागतिक राजकारणात भारत-रशिया संबंध नेहमीच भक्कम राहिले आहेत. अडचणीच्या काळात नेहमीच दोन्ही देशांनी परस्परांना साथ दिली आहे. काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द करणं असो वा ऑपरेशन सिंदूर रशियाने नेहमीच जागतिक मंचांवर भारताच्या भूमिकांच समर्थन केलं आहे. दोन्ही देशांमधील व्यापारात मोठ असंतुलन हा एक मुद्दा आहे. म्हणजे आपण रशियाकडून जेवढं खरेदी करतो, तेवढं रशिया आपल्याकडून साहित्य विकत घेत नाही. पण संरक्षण तंत्रज्ञानातली आपली कमजोरी हे देखील त्यामागे एक कारण आहे. आज आपण डिफेन्स टेक्नोलॉजीमध्ये स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर आहोत. पण स्वातंत्र्यानंतर स्वसंरक्षणासाठी लागणारी शस्त्र आपल्याला रशियानेच दिली. यामध्ये मिग-21 बायसन पासून रणगाडे, रायफल्स अशी अनेक प्रकारची शस्त्र आहेत.
1971 चं पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश मुक्तीसंग्रामाच युद्ध असो वा ऑपरेशन सिंदूर भारताने नेहमीच रशियन शस्त्र सामुग्रीच्या बळावर विजय मिळवला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये रशियन बनावटीची S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गेमचेंजर ठरली. याच एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानचे मिसाइल आणि फायटर जेटद्वारे हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडले. आता पुतिन यांच्या भारत दौऱ्यात S-400 आणि S-500 खरेदीचा करार होणार का? याकडे संरक्षण तज्ज्ञांच लक्ष लागलं आहे. भारताने 2018 सालीच रशियाकूडन S-400 च्या पाच रेजिमेंट विकत घेण्याचा खरेदी करार केला. त्यातल्या तीन रेजिमेंट मिळाल्या. दोन अजून बाकी आहेत, याला कारण आहे युक्रेन विरुद्ध सुरु असलेलं युद्ध. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी S-400 मुळे भारताला पाकिस्तानात 300 किलोमीटर आतपर्यंत जाऊन त्यांची फायटर जेट पाडता आली. त्यामुळे आता S-400 चं पुढचं व्हर्जन S-500 आपल्याला मिळणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
ती वाईट बातमी काय?
S-400 ही सिस्टिम 30 किलोमीटर उंचीवरील आणि हवाई धोका 400 किलोमीटर अंतरावर असताना वेळीच ओळखून हवेतच नष्ट करणारी सिस्टिम आहे. S-500 मुळे तर अवकाशातून होणारे हे हल्ले परतवून लावता येऊ शकतात. ही जबरदस्त एअर डिफेन्स सिस्टिम आहे. पण एक वाईट बातमी आहे. रशिया सध्या आपल्याला S-500 ही सिस्टिम देऊ शकणार नाहीय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचा शेजार लाभलेला असताना S-500 सारखी सिस्टिम लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे.