या देशात भारतीयांची चांदी, चक्क सोन्याची बिस्किटे मिळाली, एका रात्रीत उघडलं नशीब

अबू धाबी बिग तिकीट ड्रॉमध्ये चार भारतीयांचे नशीब चमकले आहे. त्यांना प्रत्येकी 200 ग्रॅम सोन्याची बिस्किटे मिळाली, ज्याची किंमत प्रत्येकी 23 लाख रुपये आहे. ऑफिस बॉय, फ्रीलान्सर, व्यावसायिक आणि अभियंता अशा या विजेत्यांनी अनपेक्षितपणे हे मोठे बक्षीस पटकावले. 

या देशात भारतीयांची चांदी, चक्क सोन्याची बिस्किटे मिळाली, एका रात्रीत उघडलं नशीब
Gold Biscuits
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 10:12 PM

परदेशात काम करण्यासाठी गेलेल्या भारतीयांचं नशीब चमकलं आहे. त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना मोठं बक्षीस लागलं आहे. अबू धाबीत कामाला गेलेल्या या चार भारतीयांना खरोखरची लॉट्री लागली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी 200-200 ग्रॅम सोन्याची बिस्किटे मिळाली आहेत. ज्यांना सोन्याची बिस्किट मिळाली त्यात एका ऑफिस बॉयचा समावेश आहे. गेल्या 23 वर्षापासून तो बहरीनमध्ये राहतो. विशेष म्हणजे या चौघांनाही 24 कॅरेटचं सोनं देण्यात आलं आहे. त्याची किंमत 96,500 दिरहम आहे, म्हणजे तब्बल 23 लाख रुपये प्रत्येकाला मिळाले आहेत.

अबुधाबी बिग टिकट ड्रॉमध्ये या चौघांना हे बक्षीस लागलं आहे. अरुणा कृष्णप्पा किडियूर, जिजॉय विश्वन, सदाथुल्ला शरीफ आणि मनीषा हर्षल कसाट अशी या नशीबवान भारतीयांची नावे आहेत. अरुणा किडियूर हे 45 वर्षाचे आहेत. गेल्या 23 वर्षापासून ते बहरीनमध्ये राहतात. ऑफिस बॉय म्हणून काम करतात. यापूर्वीही त्यांनी बिग तिकिटमध्ये भाग घेतला होता. पण त्यावेळी त्यांना नशिबाने साथ दिली नव्हती. तरीही ते मित्रांसोबत गेल्या चार महिन्यापासून हे तिकिट खरेदी करत आहेत. यावेळी त्यांचं नशिब उघडलं असून त्यांना चक्क सोनं मिळालं आहे. सोनं जिंकल्याची बातमी कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्याचं काय करायचं हे अद्याप त्यांनी ठरवलेलं नाही.

Loading...

तीन वर्षानंतर नशीब चमकलं

मनिषा हर्षल कसाट या 30 वर्षाच्या आहेत. त्या मूळच्या मुंबईच्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून त्या शारजाहमध्ये राहत असून फ्रिलान्सर म्हणून काम करत आहेत. गेल्या तीन वर्षापासून त्या तिकीट ड्रामध्ये भाग घेत आहेत. यावेळी त्यांचं नशीब उघडलं आहे. त्यांना 200 ग्रॅमचं सोन मिळालं आहे. त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, यापुढेही आपण तिकीट खरेदी करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मित्रांसोबत गेला अन्…

51 वर्षाच्या जिजॉय विश्वनचा किस्साच वेगळा आहे. जिजॉय हे केरळचे रहिवाशी आहेत. 2007पासून ते शारजाहमध्ये राहत आहेत. ते बांधकामाशी संबंधित व्यवसायात आहेत. त्यांचे कुटुंब भारतात असतं. जिजॉय प्रत्येक महिन्याला 5 ते 10 लोकांच्या ग्रुपसोबत तिकीट खरेदी करत होते. त्यांना ड्रॉच्याबाबत माहितीही नव्हती. बिग तिकीटच्या टीमनेच त्यांना फोन करून ते जिंकल्याची माहिती दिली. जेव्हा फोन आला तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी वेबसाईटवर जाऊन खातरजमा करून घेतली. बक्षिसात मिळालेलं सोनं आपल्या ग्रुपच्या मित्रांमध्ये वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर उरलेली रक्कम बायको आणि मुलांसाठी वापरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पहिल्यांदाच तिकीट खरेदी केलं आणि…

सदातुल्ला शरीफ हे सुद्धा 51 वर्षाचे आहेत. ते बंगळुरूचे राहणारे आहेत. सिव्हिल इंजीनिअर आहेत. गेल्या एक वर्षापासून दुबईत राहत आहेत. सदातुल्ला यांनी पहिल्यांदाच त्यांनी विमानतळावर तिकीटाबाबत ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी कधी ऑनलाइन तर कधी स्टोअरमधून तिकीट खरेदी केली आहेत. जेव्हा त्यांना 200 ग्रॅम सोनं जिंकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. मात्र, याचं काय करायचं ते अद्याप त्यांनी ठरवलं नाही.

काय आहे बिग तिकीट ड्रॉ?

बिग तिकिट अबू धाबीमध्ये चालणारा एक ड्रॉ प्रोग्राम आहे. त्यात भाग घेणाऱ्यांना जिंकण्याची संधी मिळते. याअंतर्गत सोन्याचं बिस्किट, रोख रक्कम आणि दुसऱ्या गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us