इराणचा मास्टरस्ट्रोक? होर्मुझ मार्ग बंद झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था हादरणार, भारतावर काय परिणाम होणार?

भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेल वापरतो. त्यातील १.५ दशलक्ष बॅरल तेल होर्मुझ जलमार्गातून येते. जगातील जवळजवळ एक चतुर्थांश तेल व्यापार या जलमार्गातून जातो. त्यामुळे जागतिक पातळीवर त्यांचे परिणाम होणार आहे.

इराणचा मास्टरस्ट्रोक? होर्मुझ मार्ग बंद झाल्याने जागतिक अर्थव्यवस्था हादरणार, भारतावर काय परिणाम होणार?
| Updated on: Jun 23, 2025 | 8:04 AM

इराण आणि इस्त्रायल युद्धात अमेरिकने उडी घेतली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. आता इराणच्या संसदेने ‘होर्मुझ खाडी’ची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कारण जागतिक आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाची २० % निर्यात या मार्गावरुन होते. दर पाच लिटर तेलामागे एक लिटर तेल येथून पुरवले जाते. महिन्याला ३००० हून अधिक तेल आणि गॅस घेऊन जाणारी जहाजे या मार्गावरून जातात.

अंतिम निर्णयाचा अधिकार खमेनींवर

इराणच्या संसदेने निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्यावर सोडला आहे. इराणच्या या निर्णयाचा परिणाम केवळ मध्य पूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगातील तेलाच्या पुरवठ्यावर होणार आहे. म्हणजेच थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते होर्मुझ जलमार्ग बंद केल्याने आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्यावर सुमारे २०% परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० ते १३० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

इराणलाही बसणार फटका

होर्मुझ जलमार्ग बंद करण्याचा सर्वात मोठा फटका इराणलासुद्धा बसणार आहे. कारण इराणचे कच्चे तेल या जलमार्गाद्वारे चीन, भारत आणि इतर आशियाई देशांना पुरवले जाते. तसेच इतर जे देश इराणकडून तेल खरेदी करतात त्यांनाही मोठा फटका बसेल. इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांनी संसदेच्या या निर्णयाला संमती दिली आणि होर्मुझ जलमार्ग बंद केला तर जागतिक अर्थव्यवस्था हादरणार आहे.

भारतावर काय होणार परिणाम?

होर्मुझ जलमार्ग हा भारतासाठी देखील खूप महत्वाचा आहे. कारण या जलमार्गातून दररोज मोठ्या प्रमाणात तेल भारतात पोहोचते. ते बंद झाल्यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते. भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेल वापरतो. त्यातील १.५ दशलक्ष बॅरल तेल होर्मुझ जलमार्गातून येते. जगातील जवळजवळ एक चतुर्थांश तेल व्यापार या जलमार्गातून जातो, जो आखाती देशांना हिंदी महासागराशी जोडतो.