
आखाती देशात सध्या युद्धाचा भडका उडला आहे. पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या मयुरी नारी या व्यापारी जहाजावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. या भीषण संकटामुळे परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धग्रस्त भागातील भारतीयांच्या मदतीसाठी २४ तास कार्यरत असणारा स्पेशल कंट्रोल रूम कार्यान्वित केला आहे.
थायलंडचे मयुरी नारी हे कार्गो जहाज गुजरातमधील कांडला बंदराच्या दिशेने येत होते. त्याच वेळी समुद्रात असताना त्यावर हल्ला करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर तैनात असलेले दोन भारतीय नागरिक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच, एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, इस्रायल आणि दुबईमध्ये प्रत्येकी एक भारतीय नागरिक जखमी झाला असून सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सातत्याने संपर्कात आहे.
यासोबत परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम आशियातील भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत इराणमध्ये सुमारे ९ हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच पश्चिम आशियात लाखो भारतीय वास्तव्यास आहेत. सध्या युद्धाच्या सावटाखाली त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय दूतावास हाय-अलर्टवर आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांच्या मदतीसाठी दिल्लीत २४ तास नियंत्रण कक्ष (Control Room) सुरू करण्यात आला आहे. या कंट्रोल रुमद्वारे विविध देशांतील भारतीय दूतावासांशी सतत संपर्क साधला जात आहे. केवळ एका दिवसात या केंद्राला ७५ कॉल्स आणि ११ ई-मेल्स प्राप्त झाले असून, संबंधित नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यात आली आहे. तसेच संकटग्रस्त नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या या कृत्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम आशियात परिस्थिती बिघडली आहे. पण सद्यस्थितीत केंद्र सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहे, अशी माहिती समोर येत आहे.