Iran-Isreal War : सगळे ज्याची वाट पहात होती अखेर ती बातमी आली.. इराणची मोठी घोषणा ! युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या 3 अटी.. ट्रम्प होणार तयार ?

गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाने जगभरात चिंता वाढवली आहे. या संघर्षामुळे जागतिक शांतता आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली असून तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी 3 प्रमुख अटी ठेवल्या आहेत. काय आहेत त्यांच्या अटी ?

Iran-Isreal War : सगळे ज्याची वाट पहात होती अखेर ती बातमी आली.. इराणची मोठी घोषणा !  युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर ठेवल्या 3 अटी.. ट्रम्प होणार तयार ?
इराणच्या राष्ट्रपतींनी ठेवल्या 3 अटी
| Updated on: Mar 12, 2026 | 10:00 AM

अख्ख्या जगात उलथापालथ माजवणाऱ्या इराण वि. इस्रायल-अमेरिका युद्ध (Iran-Isreal War) 13 दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी , म्हणजेच 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवला, त्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार झाले. त्यानंतर चवताळलेल्या इराणने अमेरिका- इस्त्रायलवर मारा करत त्यांच्यावर हल्ला केला. इराणने इस्रायलच्या शहरांवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. तसेच इराक आणि जॉर्डनमधील अमेरिकन तळांनाही लक्ष्य केलं. गेल्या 13 दिवसांपासून अविरत सुरू असलेल्या या युद्धाचा फटका फक्त 3 देशांनाच बसलेला नसून अख्ख्या जगावर त्याचा परिणा होताना दिसत आहे. या संघर्षामुळे जागतिक शांतताही धोक्यात आली आहे. मध्य पूर्वेमध्ये इराणचे हल्ले सुरूच आहेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ लागला आहे. त्यातच पाकिस्तान आणि रशियाकडून इराणची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे युद्ध रोखण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी 3 अटी ठेवल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलसोबतचा संघर्ष संपवण्याचा या तीन अटी एकमेव मार्ग आहेत. त्या मान्य झाल्या तरच हे युद्ध थांबेल असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दिला आहे.

इराणच्या 3 प्रमुख अटी कोणत्या ?

– तेहरानच्या कायदेशीर हक्कांची मान्यता

– भरपाईची रक्कम

– भविष्यातील कोणत्याही हल्ल्यांविरुद्ध आवश्यक आंतरराष्ट्रीय हमी. इराणवर भविष्यातपुन्हा कोणतेही आक्रमण होणार नाही, याची लिखित आणि ठोस आंतरराष्ट्रीय हमी देण्यात यावी.

– शिवाय, त्यांनी प्रादेशिक शांततेसाठी इराणच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

कसं थांबणार युद्ध ?

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी राष्ट्रपती पेजेशकियान यांनी अटी मांडल्या. त्यांच्या देशाचे मूलभूत हक्क ओळखून भविष्यातील हल्ल्यांविरुद्ध ठोस हमी प्रदान करणे आवश्यक आहे असा आग्रह त्यांनी धरला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात, पेझेश्कियान यांनी हे युद्ध झिओनिस्ट राजवट आणि अमेरिकेने भडकवलेले युद्ध असल्याचे वर्णन केले.

“झायोनिस्ट राजवट आणि अमेरिकेने भडकवलेल्या या युद्धाचा अंत करण्याचा एकमेव मार्ग, म्हणजे इराणचे कायदेशीर हक्क ओळखणे, नुकसानभरपाई देणे आणि भविष्यातील आक्रमणाविरुद्ध मजबूत आंतरराष्ट्रीय हमी मिळवणे,” असे पेझेश्कियान यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी हा मुद्दा मांडल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक भागीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तेहरानच्या राजनैतिक प्रयत्नांचा हा एक भाग होता. आता त्यांच्या या अटी मान्य केल्या जातात का आणि गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेला हा अविरत संघर्ष थांबतो का याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

 

Follow Us