
Israel-Hamas War : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास विरुद्ध इस्रायल युद्धाचा शनिवार हा 22 वा दिवस आहे. हा संघर्ष आता अधिक चिघळत चालला आहे. या संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत चर्चा सुरू आहे. गाझामधून इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमास विरुद्ध युद्धाची घोषणा केली. हमासला संपवल्याशिवाय शांत बसणार नाही. युद्ध जरी त्यांनी सुरु केले असले तरी ते आम्हीच संपवणार असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केले आहे.
मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी इस्रायल-हमास लढाईत तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडण्यात आला. भारताने या ठरावावर मतदान केले नाही. याचे कारण हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख ठरावात नव्हता.
संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या उपराजदूत योजना पटेल यांनी इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. दहशतवादाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. पटेल यांनी ओलिसांची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले. तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) चे 193 सदस्य देश इस्रायल-हमास युद्धासंदर्भात बोलावलेल्या 10व्या आपत्कालीन विशेष सत्रात सहभागी झाले होते. यावेळी जॉर्डनने एक प्रस्ताव मांडला. बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह 40 हून अधिक देशांनी याला अनुमोदन दिले. या ठरावावर मतदान झाल्यावर भारताने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
120 देशांनी ठरावाच्या बाजूने तर 14 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. 45 देश अनुपस्थित राहिले. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि ब्रिटनने मतदानापासून दूर राहिले. जॉर्डनने तयार केलेल्या ठरावात हमास या दहशतवादी संघटनेचा उल्लेख नव्हता. यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली.