कतारमध्ये किती भारतीय राहतात ? इराणच्या हल्ल्यानंतर टेन्शनमध्ये वाढ

इराणने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर, कतारमध्ये राहणाऱ्या सुमारे 7 लाख भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. ही संख्या कतारमधील इतर कोणत्याही परदेशी समुदायापेक्षा खूपच जास्त आहे. भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन भारतीय दूतावासातर्फे करण्यात आले आहे.

कतारमध्ये किती भारतीय राहतात ? इराणच्या हल्ल्यानंतर टेन्शनमध्ये वाढ
कतारमध्ये किती भारतीय राहतात ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 24, 2025 | 8:24 AM

कतारच्या राजधानीवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत भीतीचे वातावरण आहे. पण हे भारतासाठीही चिंतेचे कारण बनले आहे. मध्य पूर्वेतील जवळजवळ प्रत्येक देशात भारतीय राहतात, कतार हा आखाती देशांपैकी एक आहे जिथे भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कतारमध्ये जवळपास 7 लाख भारतीय राहतात. कतारमधील कोणत्याही परदेशी समुदायापेक्षा ही सर्वात मोठी संख्या आहे. येथे भारतीय नागरक हे वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त, व्यवसाय आणि ब्लू-कॉलर नोकऱ्यांसह विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत. कतारचे भारत सरकारशीही चांगले संबंध आहेत. मात्र आता कतारवर झालेल्या हल्ल्यामुळे भारतीयांच्या चिंताही वाढल्या आहेत.

भारतीय दूतावासतर्फे नोटीस जारी

या हल्ल्यानंतर, कतारमधील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी एक संदेश जारी केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, कतारमधील भारतीय समुदायाला सतर्क राहण्याची आणि घरातच राहण्याची विनंती करण्यात आली आहे. कृपया शांत रहा आणि कतारच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात येणाऱ्या स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. दूतावास आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील अपडेट देत राहील असे नमूद करण्यात आले आहे.

 

इराणचा कतारवर हल्ला

इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. इराणी अणु सुविधांवर वॉशिंग्टनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला असल्याचेही सांगितले आहे. इराणच्या सार्वभौमत्वाविरुद्ध भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे एका निवेदनात, IRGC ने असा इशारा दिला आहे. कतारने या हल्ल्याला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला. दोहामध्ये हवाई क्षेपणास्त्र प्रणाली (एअर मिसाइल सिस्टीम) सक्रिय करण्यात आली आहे. कतारची राजधानी दोहामध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आले. इराणी सैन्याने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर 10 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. राजधानी दोहा येथील हवाई क्षेपणास्त्र प्रणालीने इराणी क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न केला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, इराकमध्ये इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रोखण्यात आले. कुवेत आणि बहरीनमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणच्या हल्ल्याच्या धमकीनंतरच कतारने आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले होते. कतारमध्ये एक नवीन नोटम जारी करण्यात आला. इराणच्या धमकीनंतर दोहाला जाणारी डझनभर विमाने वळवण्यात आली. कतारला पोहोचण्यापूर्वीच विमानाचा मार्ग बदलण्यात आला.