मोठी बातमी! ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे, या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियामध्ये गोळीबार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 14, 2025 | 5:16 PM

ऑस्ट्रेलियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिडनीच्या बोंडी बीचवर ज्यू धर्मीयांचा फेस्टिवल सुरू असतानाच अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेत दहा लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्यू लोकांचा उत्सव सुरू असतानाच दोन शस्त्रधारी व्यक्ती या कार्यक्रमात घुसले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. रविवारी ही घटना घडली आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे या बीचवर ज्यू लोकांसोबतच इतर पर्यटकांची देखील मोठी गर्दी होती.

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या रिपोर्टनुसार ज्यू धर्मीयांचा उत्सव असल्यामुळे या ठिकाणी ज्यू धर्माचे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे सर्व जण इथे ज्यू धर्मातील अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या हनुका उत्सवाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी सिडनीच्या बोंडी बीचवर एकत्र आले होते, याचवेळी या ठिकाणी आलेल्या दोन बंदूकधारी व्यक्तींनी उपस्थित लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, या घटनेनंतर यातील एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे.

 

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दोघेजण काळे कपडे परिधान करून घटनास्थळी आले होते. त्यांच्या हातामध्ये दोन शॉटगन होत्या, त्यांनी इथे उपस्थित असलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येत होता. वातावारण खूपच भीतीदायक बनलं होतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे, तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हा संपूर्ण परिसर आता पोलिसांनी पर्यटकांसाठी बॅन केला आहे, नेमका हल्ला का करण्यात आला? याचा कारण अद्याप अस्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या घटनेवर दु: ख व्यक्त केलं आहे.