
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल सहा विमाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे. अद्यापही युक्रेनमध्ये 1377 विद्यार्थी अडकल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे रोमानियामध्ये पोहोचले आहेत. त्यांनी तिथे जाऊन रोमानिया आणि मोल्दोव्हामधील भारतीय राजदूतांची भेट घेतली. या भेटीदरम्यान भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

बुखारेस्ट विमानतळावर भारतात परतण्यासाठी फ्लाइटची वाट पहाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संवाद साधला. तसेच त्यांना काळजी न करण्याचे आवाहन केले.

वायुसेनेचे सी 17 हे विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रोमानियाकडे रवाना झाले आहे.

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत युक्रेनमधील भारतीय दुतावास विद्यार्थ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. या विद्यार्थ्यांना शेहनी आणि मेडेका या सीमांवर गर्दी असल्यामुळे तिकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.