
भारत-पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव आहे. सीजफायरनंतरही भारताची आक्रमक भूमिका कायम आहे. याला कारण आहे, पाकिस्तानची दहशतवादाला खतपणी घालण्याची प्रवृत्ती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूवमेंटचे (MQM) फाऊंडर अल्ताफ हुसैन (Altaf Hussain) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
फाळणीनंतर भारतसोडून पाकिस्तानात जाऊन स्थायिक झालेले शरणार्थी म्हणजे मुहाजिरांना तिथे त्रास दिला जातोय. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची अल्ताफ हुसैन यांनी मागणी केली आहे. लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केलं. बलूच लोकांच समर्थन केल्याबद्दल अल्ताफ हुसैन यांनी मोदींच कौतुक केलं. हा साहसी आणि नैतिक दृष्टया चांगलं पाऊल असल्याच त्यांनी म्हटलय.
आतापर्यंत 25 हजार मुहाजिरांचा मृत्यू
मुहाजिर समुदायाच्या समर्थनासाठी सुद्धा अशाच प्रकारचा आवाज उचलण्याची अल्ताफ हुसैन यांनी पीएम मोदींकडे मागणी केली. “मुहाजिर अनेक दशकांपासून पीडित आहेत. पाकिस्तानात त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. हे सर्व स्टेट स्पॉन्सर आहे” असं अल्ताफ हुसैन म्हणाले. “भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्य संस्थांनी कधीच मुहाजिरांना देशातील वैध नागरिक म्हणून स्वीकारलं नाही. मुहाजिरांना त्यांचे अधिकार दिले नाहीत. सैन्य कारवाईत आतापर्यंत 25 हजार मुहाजिरांचा मृत्यू झाला. हजारो लोकांना गायब करण्यात आलं” असा आरोप अल्ताफ हुसैन यांनी केला.
पाकिस्तानात मुहाजिर असहाय्य
“अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये पाकिस्तानी कॉन्सुल जनरल आफताब चौधरी यांनी एका कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला. यात अल्ताफ आणि एमक्यूएमला भारताच एजंट म्हणून दाखवण्यात आलं. असे आरोप करुन मुहाजिरांच आवाज दाबण्याच काम तिथे चालतं. पाकिस्तानात मुहाजिर असहाय्य आहेत” असं अल्ताफ हुसैन म्हणाले. “पीएम मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर मुहाजिरांचा प्रश्न मांडावा. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने या समुदायाच्या मौलिक अधिकारांची सुरक्षा करावी” अशी अल्ताफ हुसैन यांना अपेक्षा आहे.